Saturday, 3 February 2018

आमगाव पोलिस स्टेशनवर महिलांचा मशाल मोर्चा

आमगाव,दि.03ः- रिसामा येथील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीकडे संबंधित दुर्लक्ष करीत असल्याने तसेच या दारू दुकानामुळे गावातील वातावरण प्रदूषित होत असल्याने, संतप्त महिला व पुरूषांनी पोलिस ठाण्यावर मशाल काढून आपली मागणी रेटून धरली. यावेळी पोलीस प्रशानाविरोधात तुफान घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिसामा येथे जुने परवानाधारक देशी दारु दुकान बंद करण्याच्या मागणीला घेवून अनेक वर्षापासून महिला व नागरिक शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. या दारु दुकानामुळे गावातील युवक व्यसनाच्या आहारी जात असून या परिसरातून जाणार्‍या महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे दुकान बंद करून इतरत्र स्थानांतरीत करण्याची मागणी नागरिकांची आहे. परंतु रितसर पाठपुरावा करुन देखील मागणीकडे संबंधित विभाग प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांनी आपले याविरोधात आंदोलन उभारून उपोषण केले. दुकानावर दगडफेक करून प्रशासनाला जागे केले होते. परंतु प्रशासनाने आश्‍वासनापलीकडे आजवर काहीही केले नाही.
त्यामुळे १ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता अरूणा बहेकार, सिता ब्राम्हणकर, यशोदा गायधने, तृप्ती बहेकार, लक्ष्मी ब्राम्हणकर, सुलन चुटे, छबूताई उके, संजय बहेकार, तिरथ येटरे, रविदत्त अग्रवाल, रामेश्‍वर श्यामकुंवर, मेंढे यांच्यासह संतप्त महिलांनी दारू दुकान कायम बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाणे परिसरातच संबंधित प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेला दाद न देता आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्यास कारवाईचे भान ठेवत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन निवळते घेतले. आता प्रशासन यासंदर्भात तातडीने कोणती भूमिका घेते याकडे रिसामावासीयांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...