कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून, तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकण्याचे काम करणाºया ४ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी २४ जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणी शुक्रवारी दादर येथील नामांकित खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक करण्यात आली. त्यांनी आरोपी समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल याच्याकडून बेकायदेशीरपणे सीडीआर मिळविल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात यापूर्वी वाशी येथील माकेश पांडियन, कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर, गिरगाव येथील जिगर विनोद मकवाना आणि ठाण्यातील समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गुरुवारी संतोष पंडागळे आणि प्रशांत सोनवणे या आणखी दोन गुप्तहेरांना अटक केली. या दोघांच्या नवी मुंबई येथे खासगी गुप्तचर संस्था आहेत. पंडागळे आणि सोनवणे हे कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर याच्याकडून मोबाइल फोनचे सीडीआर मिळवायचे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी आरोपींजवळून १७७ मोबाइलधारकांचे सीडीआर हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कुणाचे आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जात होता आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते कुणाला पुरविण्यात आले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
No comments:
Post a Comment