मुंबई(वृत्तसंस्था)दि.18- शिवसेना आणि भाजपचं तुटता..तुटता..जुळलं आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत अखेर युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी अमित शहा यांनी शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या तर उद्धव ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचे जागावाटप ठरले असतानाच शिवसेना-भाजपा युतीचे घोडेही आज गंगेत न्हाले आहे. त्याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे लोकसभेसाठी भाजपा 25 आणि शिवसेना 23 असे जागावाटप ठरले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता या फॉर्म्युल्यात युतीतील मित्रपक्षांचाही समावेश झाला आहे. त्यानुसार मित्रपक्षांना काही जागा सोडून उर्वरीत जागांचे दोन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी निम्म्याने वाटप होणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत ‘फिफ्टी-फिफ्टी’ अर्था 144-144 जागा लढवणार आहे.काही मुद्द्यांमुळे भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील नाणार प्रकल्पाची जागेबाबत स्थानिकांना विश्वासात घेण्यात येणार आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी अर्थात वरळी सीफेस येथील हॉटेल ब्लू सीमध्ये पोहोचले. गाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील बसले होते.
No comments:
Post a Comment