Monday, 18 February 2019

रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील- राजकुमार बडोले

भव्य रोजगार व मार्गदर्शन मेळावा
नवेगावबांध,दि.18 : सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज १७ फेब्रुवारी रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित भव्य रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, अर्जुनी/मोर पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, कविता रंगारी, पदमा परतेकी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, देवेंद्र टेंभरे, विजय बिसेन, मधुकर मरस्कोल्हे, लक्ष्मीकांत धानगाये, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, प्राचार्य श्री.बलवीर, गजानन डोंगरवार, रतन वासनिक याची मंचावर उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजे. या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे बार्टीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कैलास कणसे म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, बँकींग, फायनान्स, मॅन्यूफॅक्चरींग, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, हॉस्पीटॅलिटी, एव्हीएशन व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उसगाव येथील रुपाली मेश्राम हिने वाघाशी मुकाबला करुन प्राण वाचविण्याचे शौर्य दाखविल्याबद्दल त्या विद्यार्थीनीला पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीमध्ये समता दूत पदावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी केले. संचालन रत्नाकर बोरकर यांनी केले, उपस्थितांचे आभार बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...