Friday, 22 February 2019

भंडारा जिल्ह्यात ९ लाख ७७ हजार मतदार-जिल्हाधिकारी




भंडारा,दि.22ः-येणारी लोकसभा निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली असून मतदार यादीच्या पुन:रिक्षणाचे काम सातत्याने सुरू आहे. ३१ डिसेंबर २0१८ रोजी भंडारा जिल्ह्यात एकूण ९ लाख ७७ हजार ६१४ मतदाराची संख्या निश्‍चित झाली आहे. निवडणूकीची घोषणा होईपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असून, आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची यथायोग्य अंमलबजावणीबाबत चर्चा व करावयाच्या कार्यवाहीचे नियोजन साध्य करण्यासाठी पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे व पत्रकार उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट नाही अशा मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबतची विशेष मोहिम २३ व २४ फेब्रुवारी २0१९ रोजी १0 ते ५ यावेळेत मतदार केंद्रावर, निवडणूक विभाग व तालुक्यात असलेल्या मतदान केंद्रावर आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक मतदान केंद्रात व ग्रामपंचायत मतदार याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्यांची नावे यादीत नाही अशा नागरिकांनी आताच आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. मतदार यादीत नाव नोंदविण्याची ऑनलाईन सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या सुविधेसाठी १९५0 टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. राजकीय पक्षांनी मतदान केंद्र एजंट नियुक्ती करावी, असे त्यांनी सांगितले.
३१ डिसेंबरपर्यंत जिल्हयात ९ लाख ७७ हजार ६१४ नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. यात ४ लाख ८४ हजार ४८९ महिला व ४ लाख ९३ हजार १३५ पुरुष आहेत. जिल्ह्यातील ७१ टक्के लोकांची मतदार म्हणून नोंद झाली असून स्त्री-पुरूष प्रमाण ९८३ एवढे आहे. ही आकडेवारी अतिशय चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १२0६ मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रात व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. या निमित्ताने ४४ हजार लोकांनी व्हीव्हीपॅटची माहिती जाणून घेतली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...