Saturday, 23 February 2019

लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या रागाने सभापतीने फोडले काच, फेकले साहित्य


अर्जुनी मोरगाव,दि.23 : कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहात नाही, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात, समज देऊनही यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारऱ्यांच्या कार्यपध्दतीत कसलाच फरक पडत नसल्याचे बघून संतापलेल्या पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी चक्क आपला राग (दि.22) शु्क्रवारला कार्यालयांच्या साहित्यांची नासधूस करून व्यक्त केला. लोकप्रतिनिधींना जनतेची कामे करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच कर्मचारी व अधिकारी हे आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील तर राग ही येतो. परंतु, लोकप्रतिनिधींनी तो राग अशापध्दतीने काढणे कितपत योग्य, अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे. सभापतींनी केलेला प्रकारही अशोभनीय आहे. या घटनेमुळे अर्जुनी मोरगाव पंचायत समितीसह नगरात एकच खळबळ उडाली.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदावर अरविंद शिवणकर आरूढ झाल्यानंतर त्यांनी कार्यालयीन व्यवस्थेत सुधारणा आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. नागरिकांच्या सनदीनुसार यंत्रणेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुरुप यंत्रणेकडून कामाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कर्तव्यात कामचुकारपणा दाखविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी वारंवार दिला. एवढेच नव्हेतर अनेक वेळा सभापती शिवणकर यांनी शाळा, पंचायत समिती कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन कर्तव्याला बुट्टी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचार्ऱ्यांवर शासकीय पध्दतीने कारवाई ही केली. असे असतानाही कर्मचाऱ्यांच्या वर्तणूकीत कसलाही बदल घडून आलेला नाही. या बाबीचा संताप व्यक्त करण्यासाठी शिवणकर यांनी वेगळीच भूमिका घेतली. सभापती शिवणकर हे दोन दिवसापूर्वी प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेले होते. तिथून शुक्रवारला (दि.२२) ते परतले. दुपारी १ ते १.३० वाजता सुमारास सभापती शिवणकर कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मध्यान्हाची वेळ होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी २ वाजेनंतर कर्तव्यावर उपस्थित होतील, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली. त्यानंतरही दुपारी २.३० वाजेची वेळ लोटूनही कृषी विभाग, लेखा विभागातील कर्मचारी हजर नसल्याचे बघून त्यांनी कार्यालयातील खुर्च्या, टेबल अस्तव्यस्त केले. एवढेच नव्हे तर टेबलावरील काच फोडून संताप व्यक्त केला. एवढ्यावर न थांबता सभापती शिवणकर यांनी अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यासंबधीचे पत्रही जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी व उपमुख्य कार्यपालन अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले असून कारवाई न झाल्यास 25 फेबुवारीला पंचायत समितीला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...