Saturday, 23 February 2019

गोंदिया जिल्ह्यातील निवडणुक विभाग सुस्त

मतदार नोंदणीचे अर्ज करूनही यादीत नाव येत नसल्याच्या तक्रारीत वाढ
बीएलओ म्हणतात, अधिकारीच दूर्लक्ष करतात

देवरी,दि.23-  भारतीय निवडणूक आयोग हे सार्वत्रिक निवडणुका घेण्याअगोदर मतदार याद्या अद्यावत करण्याची मोहीम राबवित असते. परंतु, गोंदिया जिल्ह्यातील निवडणुक विभागातील अधिकारी कर्मचारी याविषयी किती गंभीर आहे, याची प्रचिती मतदारांना वेळोवेळी अनुभवायला मिळते. मतदार नोंदणीचे अर्ज बीएलओ मार्फत निवडणुक विभागाकडे सोपविले जातात. परंतु, नवमतदारांचे नाव यादीत समाविष्ठ केले जात नाही. तसेच मतदारांचे नाव सुद्धा गाळले जात नाही. असा आरोप  आता होऊ लागला आहे. परिणामी, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन मरगळलेल्या यंत्रणेला वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात दरवर्षी 1 जानेवारी या दिनांकाला अर्हता मानून मतदार याद्या पुनर्परीक्षणचे कार्य हाती घेण्यात येते. याविषयी मतदाराना जाणीक करून देण्यासाठी जाहिरातींसह शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार केला जातो. बुथ पातळीवर अनेक नवीन मतदार नमूना 6 मध्ये अर्ज करून आपल्या नावाची नोंदणी बीएलओ कडे करीत असतात. असे असताना संबंधितांचे नाव मतदार यादीत येणे अपेक्षित असते. मात्र, एवढी प्रक्रिया करून देखील अनेकांची नावे यादीतून गायब राहतात. यासंबंधी काही स्थानिक बीएलओंकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही आपली कामे करून ती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जमा करतो. तरी नावे यादीत समाविष्ठ न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याचे अनेक बीएलओंचे म्हणणे आहे. याशिवाय मतदारांची नावे कमी करण्याचे काम सुद्धा होत नसल्याची माहिती आहे. परिणामी, अनेक नवमतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतात.
नवमतदारांमध्ये अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणानिमित्त त्यांना शहराचे ठिकाणी गावापासून लांब राहावे लागते. त्यामुळे त्यांना सदर प्रक्रिया करण्यासाठी वारंवार गावाला जावे लागत असल्याने त्यांच्यात कमालीच संताप निर्माण झाला आहे.
भारताचे निवडणुक आयोग कोणीही आपले लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी कितीही कष्ट उपसत असले, तरी अधिकाऱ्याच्या हलगर्जी पणामुळे मतदार यादीची पुनर्रचना वा पुनर्परीक्षण योग्यरीत्या होताना दिसत नाही. या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, यासंबंधी देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क केला असता  तो होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...