Saturday, 16 February 2019

शहीद जवान संजय राजपूत यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप;शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


-केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वाहीली श्रद्धांजली
-हजारो उपस्थितांचा शहीद जवानांना अखेरचा निरोप
बुलडाणा, दि 16 : अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या देशभक्तीचे स्फुलींग उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मलकापूरचे आसमंत निनादून गेले. काल जम्मू व काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मलकापूर येथील संजय राजपूत व गोवर्धन नगर ता. लोणार येथील नितीन राठोड जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज १६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मलकापूर येथे जनता कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात शहीद जवान संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौथाऱ्यावर शहीद जवान संजय यांचे सुपूत्र जय याने मुखाग्नी दिला. तसेच छोटा मुलगा शुभम यावेळी उपस्थित होता. यावेळी हजारो उपस्थितांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, मध्यप्रदेशातील खंडवा येथील खासदार नंदकुमार चव्हाण, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार ॲड आकाश फुंडकर, बुलडाणा कृउबासचे सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष हरीष रावळ, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आयजीपी आशुतोष कुमार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. केंजळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली. शहीद जवान संजय राजपूत यांच्याय कुटूंबियांशी यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांत्वन केले व शासनाने जाहीर केलेल्या ५० लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटूंबियांना दिला.
सुरूवातीला औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने शहीद संजय यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर मलकापूर शहरातून फुलांनी सजविलेल्या वाहनातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मलकापूर शहरात गर्दीने उच्चंक केला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी , फुलांच्या पाकळ्यांनी मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले. भावूक वातावरणात रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या नागरिकांनी फुले वाहून श्रद्धांजली वाहली.अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी , विविध शासकीय विभागांचे अधिकारी, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...