यवतमाळ(विशेष प्रतिनिधी)दि.21 : जिल्ह्यातील पांढरकवडा येथे 16 फेबुवारीला झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी घडली. क्षितीजा बाबूराव गुटेवार (१२) रा. शिवाजी वार्ड पांढरकवडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
क्षितीजा ही पांढरकवडा येथील जिल्हा परिषद विद्यालयाची सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच आॅटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता आणि सात वर्षाचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यातच सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. घसा कोरडा पडत असताना दूरदूरपर्यंत पाणी दिसेनासे झाले. त्यातच गर्दी असल्याने तेथे अडकलेल्या महिलांना बाहेर निघणेही कठीण होते. कुणी निघण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलिसांकडून आडकाठी आणली जात होती.सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’ असे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना रहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी क्षितीजाची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment