Sunday, 24 February 2019

दुष्काळ,नोकरभरतीसह विविध मुद्यावर सरकारला घेरणार-विरोधी पक्ष

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.24 : शिवसेना – भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे. एकेकाळी ज्यांना अफजल खान म्हटले, त्यांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठ्या मारल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.पत्रपरिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंढे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत चव्हाण,आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपासह शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना – भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेने युती केली आहे. तसेच, निवडणुकी आधीचे अधिवेशन म्हणजे युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर करणार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या मार्चमध्ये होण्याची शक्यता असल्याने उद्यापासून ६ दिवस राज्याचे लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात सरकारला दुष्काळाच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. यासोबतच, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावरही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर, भाजपा सरकारच्या काळात राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकरी अनुदानाचे नवे गाजर सरकारकडून दाखविण्यात आले. सरकारची पीक योजना फसवी निघाली. त्यामुळे आता सरकारच्या या फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.गेल्या वर्षी २८ मार्च २०१८ मध्ये ७२ हजार नोकरभरतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले. तरी सुद्धा एकही जागा भरलेली नाही. आता आचारसंहितेच्या तोंडावर पुन्हा नोकरभरतीचे गाजर सरकार दाखवणार आहे, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने हा निर्णय सरकारला बदलावा लागला आहे. केवळ ४ महिन्यांच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर हे अधिवेशनापूर्वी अभिभाषण करणार आहेत. अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधक सरकारला धारेवर धरण्याची तयारी करत आहेत

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...