गडचिरोली,दि.१२: विटाभट्टी परवान्याच्या मंजुरीसाठी संबंधित व्यक्तीकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरीचा तहसीलदार यशवंत तुकाराम धाईत (५५)वर्ग-१ यास रंगेहाथ पकडले.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा विटाभट्टीचा व्यवसायिक असून, त्याला विटाभट्टीच्या परवान्यास मंजुरी हवी होती. त्यासाठी त्याने तहसील कार्यालयात अर्ज केला. परंतु परवाना मंजुरीसाठी तहसीलदार यशवंत धाईत याने तक्रारकर्त्यास ५ हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून तहसीलदार यशवंत धाईत यास तक्रारकर्त्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, तुळशीराम नवघरे, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment