भंडारा :दि. २९ : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली असून यंदा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रमेशराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील ओमप्रकाश बाबुराव गायधने यांची निवड करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील दोन शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणारे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने राज्य पुरस्कार देवून गौरविल्या जाते. यंदा भंडारा जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पवनी येथील अषित प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक अशोक रमेशराव गिरी यांना प्राथमिक विभागातून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत झाला आहे. तर तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक ओमप्रकाश बाबूराव गायधने यांना माध्यमिक विभागातून हा पुरस्कार घोषित झाला आहे.
अशोक गिरी हे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेत शिक्षक असून त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या शाळेत विद्यार्थी इंग्रजीतून परिपाठ सादर करतात. त्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी दररोज नागरिकांची शाळेत उपस्थिती असते. पलकांमध्ये जनजागृती करून शाळेत विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सिहोरा येथील ओमप्रकाश गायधने यांनी विद्यार्थी व समाजोपयोगी उपयोगी उपक्रम राबवून आपल्या शाळेचे नाव राज्यस्तरावर नेले आहे. या दोन्ही शिक्षकांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment