Tuesday 7 August 2018

सदोष सेवेबद्दल स्टेट बॅंकेला दंड


state bank of indiaमुंबई,दि.07 : मुंबईतील एका महिलेची चूक नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सदोष सेवेमुळे तिच्या बँक बचत खात्यातील तब्बल पाच लाख रु. वेगवेगळ्या १६ व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्स्फर होऊन तिचे आर्थिक नुकसान झाल्याने ग्राहक न्यायालयाने बँकेला दणका दिला आहे. या महिलेने गमावलेले पैसे नोव्हेंबर, २०१०पासूनच्या व्याजासह परत करा, असे आदेश न्यायालयाने बँकेला दिले आहेत. 

दक्षिण मुंबईतील मरियानिन्हा डिसुझा यांचे एसबीआयच्या पेडर रोड शाखेत गेल्या २० वर्षांपासून खाते आहे. बँकेकडून त्यांना जुलै, २०१०मध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळाली होती. मात्र, २३ व २४ नोव्हेंबर, २०१० या दोन दिवसांत त्यांच्या खात्यातील तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्स्फरने वेगवेगळ्या १६ व्यक्तींच्या खात्यांमध्ये गेली. त्यावेळी मोबाइल सिमकार्ड खराब होऊन मेसेज येणे बंद असल्याने त्यांना या व्यवहारांची कल्पना नव्हती. नंतर या व्यवहारांविषयी कळल्यावर त्यांनी बँकेत लेखी तक्रार देऊन पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे बँकिंग व्यवहारांविषयीच्या लोकपालांकडे दाद मागितली आणि पोलिसांत तक्रारही नोंदवली. मात्र, 'लॉगइन आयडीबाबतची गुप्तता पाळण्याची जबाबदारी ही ग्राहकाचीच असते. त्यामुळे या प्रकाराबद्दल बँकेला दोषी धरता येणार नाही', अशी भूमिका सुरुवातीपासूनच घेणाऱ्या बँकेकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी २०१३मध्ये दक्षिण मुंबईतील ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. मंचासमोर डिसुझा यांच्यातर्फे अॅड. चेतन अगरवाल यांनी बाजू मांडली, तर बँकेची बाजू अॅड. प्रशांत पानसरे यांनी मांडली. यावेळी बँकेला दोषी धरत गोठवलेल्या काही खात्यांमधील न्यायप्रविष्ट असलेले १ लाख ४५ हजार ९०८ रुपये वगळता उर्वरित ३ लाख ४४ हजार ९१ रु. डिसुझा यांना नोव्हेंबर, २०१०पासून ६ टक्के व्याजदराने ऑगस्टअखेरपर्यंत द्यावेत. त्याशिवाय मानसिक त्रास व न्यायालयीन खर्चापोटी त्यांना २५ हजार रु.ची भरपाई द्यावी, असे आदेशही मंचाने दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...