नागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयशा शेख असे आरोपी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.दरम्यान आयशा शेख यांनीही आपल्याला सदर एजंटाने डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलिस शिपाई आयशा शेख हिने पुण्याला जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करायची होती. त्यासाठी ती शनिवारी दुपारी मानकापुरातील कुणाल हॉस्प्टिलमसमोर असलेल्या “6-टेन’ नावाच्या कार्यालयात गेली होती. तिने 1,700 रुपयांची रेल्वेची तिकीट बूक करण्यासाठी एटीएम कार्ड स्वॅप केले. त्यानंतर ती घरी पोहोचली. दरम्यान, तिच्या मोबाईलवर 15 हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे ती आई, बहीण आणि अन्य नातेवाइकांसह एजेंटच्या कार्यालयात पोहोचली. त्याच्यावर 15 हजार रुपये अतिरिक्त काढल्याचा आरोप केला. त्यामुळे एजेंट आणि आयशा यांच्यात “तू-तू-मैं-मैं’ झाली. त्यानंतर मात्र आयशाने जोरदार भांडण करीत एजेंट पुष्पेंद्र सिंह पशुपतिनाथ सिंह (रा. जयहिंदनगर) यांच्या डोक्यावर डीओची बाटली मारून जखमी केले. पैशाची मागणी केली. मात्र, पुष्पेंद्र सिंह यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आयशाने पुष्पेंद्र यांच्या काउंटरमधून 500 रुपयांच्या नोटेचे बंडल बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पुष्पेंद्र यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहाला गुन्हा दाखल केला. एका सामाजिक संघटनेच्या आठ ते दहा तरुणांनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment