झारसुगुडा (ओडिशा),दि.05 : समाज परंपरांच्या भीतीपोटी एका गरीब व निराधार वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही धजावत नसताना येथील आमदाराने स्वत: तिचे अंतिम विधी केल्याची घटना घडली. संबंधित महिलेची जात माहीत नसल्याने समाज वाळीत टाकेल, या भीतीने गावातील कोणीही पुढे आले नसल्याचे समजते.
झारसुगुडा मतदारसंघातील अमनपाली गावात संबंधित महिला ही भिक्षा मागून जगत होती. तिचा मृत्यू झाल्यानंतर जात माहिती नसल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे, हा प्रश्न गावातील नागरिकांपुढे उपस्थित झाला. समाजाकडून वाळीत टाकले जाण्याच्या भीतीने कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी रेंगाली मतदारसंघातील बिजू जनता दलाचे आमदार रमेश पटुआ यांच्या कानावर ही बाब टाकली. जातव्यवस्थेबाबत माहिती असल्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील घटना नसतानाही तातडीने आपला मुलगा आणि भाच्याच्या साह्याने संबंधित महिलेची अंत्ययात्रा काढत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
पटुआ यांनी त्यांच्या या कृत्यातून समाजापुढे आदर्श ठेवला असून याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. रमेश पटुआ हे ओडिशातील सर्वांत गरीब आमदारांपैकी एक असून, ते अद्यापही भाड्याच्या घरात राहतात.
No comments:
Post a Comment