नांदेड,दि.26 : काही विशिष्ट लोकांसाठी पाच हजार वर्षांपासून असंविधानिक पद्धतीने आरक्षण आहे. ते आरक्षण बंद होऊ नये यासाठीच घटनात्मक आरक्षणाला विरोध केला जात असल्याची टीका विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी केली. भारतीय संविधानाने देशाची विविधता जपली आहे. म्हणूनच, हा देश टिकून आहे. आता काहीजण संविधानाच्या मागे लागले आहेत. देशातील लोकशाही संपवून झुंडशाहीचे राज्य आणण्यासाठीच संविधानाला विरोध केला जात असल्याचे कन्हैयाकुमार यांनी सांगितले.
संविधान गौरव समिती आणि तन्जिम-ए-इन्साफ यांच्या वतीने शनिवारी रात्री येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात कन्हैयाकुमार यांची सभा झाली. प्रारंभी विषमतेचे प्रतीक म्हणून ठेवलेल्या मडक्यांची उतरंड कन्हैयाकुमार यांनी काठीने फोडली. सभेला अभूतपूर्व गर्दी होती. ही गर्दी पाहून कन्हैयाकुमार यांनी नांदेडमधील यापुढची सभा खुल्या मैदानात घेऊ, असा शब्द देवून भाषणाला सुरुवात केली. उतरंड फोडतानाचा हातातील दांडा पाहिल्यानंतर हा देश दंडुक्याने चालत नाही तर तो माणसाने चालतो, अशी टिप्पणी करीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. विविध जाती, धर्म, पंथ असलेला हा विशाल देश केवळ संविधानामुळेच टिकून आहे. भाजपानेही या संविधानाचा सन्मान करायला हवा. चहा विकणारे मोदी केवळ या संविधानामुळेच पंतप्रधान होऊ शकले. असे सांगत त्यांच्या चहा विकण्याच्या म्हणण्याबाबत मात्र मी साशंक असल्याचे सांगत फोटोची आणि मार्केटिंगची एवढी हौस असलेल्या मोदींनी चहा विकतानाचा एखादा तरी फोटो दाखवायला हवा होता, असा चिमटा कन्हैयाकुमार यांनी काढला. एका पंतप्रधानाला माझ्यासारखा विद्यार्थी जाहीरपणे प्रश्न विचारु शकतो, हीसुद्धा या संविधानाचीच ताकद असल्याचे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी थेट निवड झालेली नाही. तर निवडून आलेल्या खासदारांनी त्यांना नेता निवडून पंतप्रधानपदी बसविले आहे. मात्र आज ते देशात अध्यक्षीय पद्धत असल्यासारखे वागत आहेत. २०१९ च्या निवडणुकांना तोंड कसे द्यायचे, याची चिंता आज भाजपाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते २०२२ मध्ये आम्ही काय करणार? ते सांगत आहेत. खरे तर २०१४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठी या सरकारला निवडून दिलेले आहे. या सरकारने या चार-पाच वर्षांत देशहिताची काय कामे केलीत? हे सांगायला हवे. मात्र भाषणबाजी सोडून दुसरे काहीही केलेले नसल्याने हे आता २०२२ ची भाषा बोलत आहेत. हा खरे तर देशातील जनतेचा आणि संविधानाचाही अपमान असल्याचे कन्हैयाकुमार यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी ‘सबका साथ सबका विकास’, विदेशातून काळे धन आणणार, दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देवून ‘अच्छे दिन’ आदी विविध घोषणा केल्या होत्या. जनतेने या घोषणांच्या बळावरच तुम्हाला सत्ता दिली. आता तुम्ही जनतेसाठी काय केले ते सांगा? असा सवालही कन्हैयाकुमार यांनी केला.
पंतप्रधान मोदी हे नेहमी निवडणूक प्रचाराच्या मूडमध्ये असतात. मार्केटिंगचे उस्ताद असलेले मोदी हे प्रधानमंत्री आहेत की प्रचारमंत्री ? असा प्रश्न पडतो. असे सांगत निवडणुकीमध्ये पप्पू कोण? ते जनता ठरवेल. मात्र मागील चार वर्षांतील कारभार पाहिल्यानंतर आपण गप्पू आहात हे मात्र सिद्ध केले, अशी टीकाही कन्हैयाकुमार यांनी मोदी यांच्यावर केली. नोटाबंदीनंतर काळा पैसा का कमी झाला नाही. जनधन योजना आल्यानंतर सर्वसामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये का टाकले नाहीत, की हा सर्व पैसा अमित शहा यांच्या मुलाच्या खात्यावर टाकला? असे प्रश्न उपस्थित करीत देशातील लाखो तरुण आज बेरोजगार आहेत. तर शिक्षणापासून वंचित राहणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे.
सत्तेत आल्यानंतर शिक्षणाचे बजेट २४ टक्क्यांनी कमी केले. याचा फटका कोणाला बसणार? या देशातील वंचित, गरीब, कष्टकरी, मागासवर्गीयांनाच डॉ. बाबासाहेबांनी घटनेत सर्वांना शिक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले होते. मग देशातला मोठा वर्ग शिक्षणापासून दूर का ठेवला जात आहे? या परिस्थिती विरोधात आम्ही प्रश्न विचारणारच, असे सांगत त्यास तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर म्हणा, असेही कन्हैयाकुमार यावेळी म्हणाले.सभेच्या प्रारंभी प्रदीप नागापूरकर यांनी प्रास्ताविक, फारुख अहेमद यांनी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन नयन बाराहाते यांनी तर आभार रमेश सोनाळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment