गडचिरोली ,दि.17 – नामांकित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलेल्या प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या संस्थाचालकांसह मुख्याध्यापक व नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षांवर देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या शाळेत मुलांच्या सोयीसुविधांवरून वाद सुरू होता. आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने आदिवासी विकास विभागाने तीन वर्षांपूर्वी नामांकित शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. याच प्रक्रियेतून नक्षलग्रस्त भागातील हजारो विद्यार्थी नागपूर विभागातील विविध नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील दोनशेच्यावर विद्यार्थी देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होते. मात्र या विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करून अन्य मुलांसोबत शिक्षण दिले जात नव्हते. त्यांना सोयीसुविधाही पुरेशा नसल्याची तक्रार पालकांनी प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली होती. दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने आमच्या मुलांचे अन्य नामांकित शाळेत समायोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकारी श्री. ओंबासे शासनाकडे पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी आदिवासी आमदारांच्या एका समितीने प्रत्यक्ष देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटला भेट देऊन चौकशी केली होती. यामध्ये सत्यता आढळून आल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण विभागाला पत्र पाठवून सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली
होती. त्यानुसार गेल्या महिन्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशावरून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव कोडापे हे 13 ऑगस्ट 2018 ला विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक सॅमुल जॉन, माजी नगराध्यक्ष निलोफर शेख व संस्था अध्यक्ष योगराज कुथे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलिसांत तक्रार देण्यात आली असून या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment