नागपूरदि.06 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्वस्त धान्य दुकानाविषयीच्या एका प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला. याशिवाय मंत्र्यांनी दुकानाविरुद्ध दिलेला आदेश सुद्धा न्यायालयाने रद्द केला.
गोंदिया जिल्ह्यात गणेश नेवारे यांचे १९८५ पासून स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाविरुद्ध शोभा बावनकर व इतरांनी वजनमाप कमी देणे, नियमापेक्षा जास्त भाव घेणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्यामुळे दुकानाचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. त्याविरुद्ध नेवारे यांनी विभागीय पुरवठा उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय पुरवठा उपायुक्तांनी अपील मंजूर करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला होता. परिणामी, तक्रारकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून विभागीय पुरवठा उपायुक्तांचा आदेश रद्द केला व जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा आदेश कायम ठेवला. तत्पूर्वी दुकानाचे लायसन्स नेवारे यांच्या पत्नी कौशल्या यांच्या नावावर करण्यात आले होते. त्यामुळे कौशल्या नेवारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी विविध बाबी लक्षात घेता त्यांची याचिका मंजूर केली आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा वादग्रस्त आदेश रद्द करून त्यांच्यावर दहा हजार रुपये दावा खर्च बसवला. याचिकाकर्तीतर्फे अॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.
No comments:
Post a Comment