Monday, 6 August 2018

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत चंद्रपूरला भरीव निधी : हंसराज अहिर




चंद्रपूर ,दि.06: जिल्ह्यातील पंधराशेच्यावर गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सरपंचांच्या भरगच्च मेळाव्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हाभरातील सरपंचांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत गावागावांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती उपस्थित सरपंचांना दिली. लक्षावधीचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणार आहे. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते. मंचावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या गावाच्या समस्या मांडल्या.
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ही योजना आखली आहे. ही योजना बाधीत क्षेत्रातील (खाणीमुळे बाधीत झालेली गावे) सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसंख्या व बाधित क्षेत्र, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबवताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थिती वरील आघात कमी करणे, क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घमुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठी या निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी या योजनेअंतर्गत चंद्रपूरला मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...