Friday, 17 August 2018

गोंदिया शहराशी निवडणूक प्रचारामूळे राहिले वाजपेंयीचे घनिष्ठ नाते

गोंदिया,दि.16 : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. वाजपेयींनी गोंदिया जिल्ह्याला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तीनदा भेट दिली. त्यांचे जिल्ह्यातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते संबंध होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यकर्त्यांशी थेट नाळ असणारा नेता म्हणजे वाजपेयी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
१९६८- ६९ च्या दरम्यान अखिल भारतीय जनसंघाचे अध्यक्ष असताना अटलबिहारी वाजपेयी हे गोंदिया शहरात पक्षवाढ आणि कार्यकर्ते भेटीसाठी येऊन गेले होते. त्यावेळी ते श्रीटाॅकीज शेजारील बालकृष्ण भादुपोते यांच्याकडे मुक्कामी थांबले असताना दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून विहिरीतील पाणी स्वतःच बादलीने काढून आंघोळ करुन सकाळीच तयार झाल्याची बाब भादुपोते कुटूबियांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांना त्यांच्या साध्या व्यक्तिमत्वाची झलक बघावयास मिळाली होती. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे  १९७८ मध्ये आणिबाणीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत डाॅ.राध्येशाम(बबली)अग्रवाल यांच्या प्रचारार्थ गोंदियाला आले होते. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ १९९१ आणि १९९६ मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारार्थ ते गोंदियाला आले होते.
१९९१ ला खुशाल बोपचे यांच्या प्रचारासाठी आले असताना प्रचारसभेची वेळ सकाळी ८.३० वाजेची ठेवण्यात आली होती.ती सभा इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती.परंतु, सकाळीच लोक येणार नाही,म्हणून ती सभा २ तास उशीरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. नागपूरवरून वाजपेयींनी उशीरा गोंदियात पाठवा असा निरोप देण्यात आला होता. परंतु, वाजपेयींनी ठरलेल्या वेळेतच मी सभेला संबोधित करणार, सभेत पाच लोक राहिले तरी चालतील ही भूमिका घेतल्याने आयोजकांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. तेव्हा स्पष्ट नकार देत वेळेवरच सभेला येणार ही स्पष्ट भूमिका घेतल्याने अडचण निर्माण झाली होती. परंतु, आम्ही कसे तरी प्रयत्न केले आणि वाजपेयींजी येणार म्हणून लोकांतही उत्साह असल्याने त्यावेळी सकाळी 8.30 च्या सभेला जवळपास 15 ते 20 हजारांची गर्दी होती, अशी आठवणन मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितली. त्या सभेत त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा नाव न घेताच सिध्दांतावर मत मांडले होते. व्यक्तिगत टीका केली नव्हती.जाहिर सभेतील भाषणात त्यांना खोटे बोलून घ्या, असे म्हटले असता ते चिडल्याचे ही मधु अग्रवाल यांनी सांगितले.
वाजपेयी हे जेव्हा ही गोंदियात आले त्यावेळी अनेक भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गोंदिया येथील विश्रामगृहात त्यांनी तेव्हा स्थानिक पत्रकार आणि भाजप कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. 1996 मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारासाठी आले असता त्यावेळी राज्यातील मंत्री व  आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्याशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निवडणूक प्रचारार्थ त्यांची जिल्ह्यात झालेली भाषणे अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत.
शेतकरी,गाव आणि गरिबांबद्दल आपुलकी ठेवणारा नेता हरपला-माजी खासदार प्रा.शिवणकर
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपूर्वी म्हणजे जनसंघापासून भारताच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारेच नव्हे तर गावखेड्यात राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याबद्दल अपार आपुलकी ठेवणारे व्यक्तीमत्व अटलबिहारी बाजपेयी होते. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व भाजपमध्ये शोधूनही सापडणार नाही, अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्याने भाजपचेच नव्हे तर देशाची अपरिमीत हानी झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार तथा भाजप किसान आघाडीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.महादेवराव शिवणकर यांनी व्यक्त केली. शिवणकर यांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयी यांच्याशी आलेल्या संपर्कानंतरच्या प्रसंगाबाबत बोलताना म्हणाले की ते सर्वसामान्य कार्यककर्त्यांना आपल्यासोबत घेऊन चालणारे नेते होते. एकदा पक्षाच्या एका सभेला मी त्यांच्यासोबत जात असताना त्यावेळी माझा कुर्त्याच्या मागचा कॉलरचा काहीभाग हा फाटलेला होता. तो फाटलेला भाग त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्याजवळील सुईधागा काढून लगेच तो भाग शिवायला हाती घेतला. तेव्हा मी काय करतात हे बघायला गेलो तर ते सुईधागा घेऊन फाटलेला भाग शिवत असताना अरे महादेव तुझा कुर्त्याच्या कॉलरचा भाग फाटलेला आहे, तो मी शिवून देतोय, असे म्हणाल्याची आठवण त्यांनी आज आवर्जुन सांगितली. सोबतच शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते. परंतु, जगात सबसिडी बंद असल्याचे बघून त्यांनीही भारतात कृषिवरील सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी भाजप किसान आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. मला माहिती होताच मी भाजपचे त्यावेळचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्यामार्फत बाजपेयींना हा निर्णय आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी चुकीचा ठरेल आणि नुकसादायक राहील, हे पटवून सांगितले. तेव्हा त्यांनी तो निर्णय रद् केला आणि त्यावेळचे कृषीमंत्री अजितसिंग यांना भेटायला सांगितले. परंतु, अजितसिंग काही भेटत नव्हते. शेवटी ते भेटत नसल्याचे सांगितल्यावर बाजेपेयींनी त्यांच्याकडून कृषीमंत्रीपदच काढून ते राजनाथसिंह यांना दिले होते, असे शिवणकर यांनी त्यांच्या आठवणीप्रसंगी सांगितले.
हाडामासाचा सच्चा कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा नेता हरपला-माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे
प्रखर राष्ट्रनिष्ठा हा आदर्श त्यांनी पक्षात रुजविलेला आदर्श आणि पक्षाच्या प्रत्येक सामान्य कार्यकत्र्याला मानसन्मान हा त्यांच्या व्यक्तिमत्वाची स्पष्ट ओळख देणाऱ्या गोष्टी म्हणाव्या लागतील.  ते संवेदनशील मनाचे पण कणखर,दृढनिश्चयी कवी होते. दृष्टे, निर्भिड, विद्वान पत्रकार होते.आपल्या मधुरवाणीने जाहीर सभांच्या माध्यमातून लोकांंना मोहित करुन सभा जिंकणारे वक्ते होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अटलबिहारी बाजपेयीजी जेव्हा गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे आयोजित माझ्या प्रचारासाठी आले होते तेव्हाच लक्षात आली. निष्कलंक,निस्वार्थी,निग्रही, निर्भिड,शिस्तप्रिय अजातशत्रू राजकारणी म्हणून जेवढा गौरव केला जातो, तेवढयाच तेजस्वी  त्यांच्या कविता आहेत.अटलजींची विचारधारा व व्यक्तीमत्व त्यातून व्यक्त होते. त्यांच्यासोबत निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून त्यांच्याजवळ बसण्याची व चर्चा करण्याची मिळालेली संधी आणि लोकसभेत मिळालेले मार्गदर्शन हे विसरता न येणारे आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष असतानाही त्यांच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली होती.
 
देश युगप्रवर्तकास मुकला- पालकमंत्री संजय राठोड
वाशिम, दि.  १६ – माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देश एका युगप्रवर्तक नेत्यास मुकला आहे. असे संयमी व समर्पित नेतृत्व पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.  ते संवेदनशील कवी, कुशल संघटक व  उत्तम प्रशासक आणि लोकहीतकारी नेते होते. सामाजिक आणि राजकीय जीवन कसे जगावे याचे वस्तुपाठ त्यांनी आपल्या आचरणातून घालून दिले. त्यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे, असे पालकमंत्री श्री. राठोड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
 
अपराजित व्यक्तिमत्व हरपलं : अशोक इंगळे
गोंदिया : राजकारण बाजूला सारून ज्यांनी हा देश, हा राष्ट्र एकमेव असून ज्यांनी कारगिल जिंकलं असे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन आज झाले. अटलबिहारी वाजपेयी हे अपराजित व्यक्तिमत्व होते, अशी शोक प्रतिक्रिया गोंदिया नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी दिली. अटलजी हे अद्वितीय आणि अपराजित व्यक्तिमत्व होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...