गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या नियमबाह्य काम करून शासकीय निधीची लूट करीत असल्याची तक्रार करत त्यांना पदावरुन दूर करण्याची मागणी करणारे उपसरपंच हिरामण बावणकर यांच्यावर आज सरपंच श्रीमती चौरे यांनी हल्ला करुन मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, सरपंचांनी मारहाण केल्यानंतर उपसरपंचांनीही मारहाण केल्याचे बोलले जात असून उपसरपंच बावनकर यांच्या डोक्याला,चेहऱ्र्याला जबर मार लागलेला आहे. तर सरपंचांना ओढताण करण्यात आल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणी दोघांनीही गंगाझरी पोलिस ठाण्यात धाव घेत एकमेकाविरुध्द तक्रार नोंदविली आहे. गेल्या वर्षभरापासून उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच श्रीमती चौरे यांच्या कार्यप्रणालीचा विरोध करीत त्यांना पदावरून हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची सुनावणी होऊनही अद्यापही निकाल न दिल्याने उपसरपंच बावनकरांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासंबधीचे वृत्त आज अनेक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सकाळी हा वाद झाला. दरम्यान, गंगाझरी पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रकिया केली असून उपसरपंचाविरुध्द अट्रासिटी कायद्यांतर्गत सुद्धा कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.
No comments:
Post a Comment