Wednesday 30 January 2019

चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून मागितली ३ हजारांची लाच; पोलीस शिपाई एसीबीच्या सापळ्यात

गोंदिया दि. 30:संशयावरून मजुराला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱया पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. भुमेश्वर देविलाल येरणे असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. 
गावात मोलमजूरी करुन आयुष्य जगणारे तक्रारदार हे मजूर आहेत. २ महिन्यापूर्वी मौजा दहेगावच्या शेतातून मोटारपंपाची चोरी झाली होती. या चोरीच्या गुन्ह्यात दहेगावच्या २ व्यक्तींना आमगावच्या पोलिसांनी अटक केली. चोरीच्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी येरणे यांनी तक्रारदारास आमगाव पोलीस ठाण्यात नेऊन विचारपूस करुन सोडून दिले. त्यानंतर येरणे यांनी तक्रादाराच्या घरी येऊन तक्रारदारास चोरीच्या गुन्ह्यातून काढले, असे सांगून ३ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास तक्रारदारास अटक करण्याची भीती त्यांनी दाखविली. तक्रारदारांनी येरणेंविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार नोंदविली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्याचे शिपाई यांच्याविरुद्ध सापळा रचला.
यात ३४ वर्षीय आरोपी भुमेश्वर देविलाल येरणे यांनी पदाचा दुरुपयोग करुन मोटारपंप चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटक करण्याची भीती दाखवत लाचेची मागणी केली. नितीन ईश्वरदास तिरपुडे यांच्याकडून लाच स्वीकारली असे कबूल केले. दोन्ही आरोपींविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...