Thursday 24 January 2019

पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा


maharashtra times
Sunil Arora: पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा
नवी दिल्ली 

ईव्हीएम हँकिंगच्या वादानंतर तीनच दिवसांनंतर, 'भारतात आता पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार नाही', असे स्पष्ट करत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ईव्हीएम हँकिंगचा वाद बाजूला सारला आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात अरोरा बोलत होते. भारतात वापरात असेलेल्या ईव्हीएम हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा लंडनमधील हॅकथॉनमध्ये एका कथित सायबर तज्ज्ञाने दावा केला होता. यानंतर ईव्हीएमद्वारेच मतदान घेतले जाईल असे स्पष्ट करत मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता फेटाळून लावली. 
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हँक झाल्याचा दावाही कथिक सायबर तज्ज्ञ सय्यद सुजा याने केला होता. यानंतर याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे पत्राद्वारे केली होती. संसद मार्ग पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर यापुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात या विरोधी पक्षांच्या मागणीला जोर धरू लागला. 

'यापुढेही आम्ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर सुरूच ठेवू', असे अरोरा यांनी दिल्लीतील कार्यक्रमात जाहीर केले आहे. याबाबत राजकीय पक्ष किंवा इतर कुणीही केलेल्या तक्रारींचे, तसेच सूचनांचे आम्ही स्वागत करू, असेही अरोरा पुढे म्हणाले. हँकिंगसंदर्भातील चर्चेमुळे आम्ही मुळीच घाबरणार नसून, आता देशात मतपत्रिकेचा काळ पुन्हा आणणार नाही, अशा शब्दात अरोरा यांनी मतपत्रिकेची शक्यता फेटाळून लावली. 

ईव्हीएममध्ये कुणीही अफरातफर करू शकणार नाही असे अरोरा यांनी हँकिंगवादापूर्वीही स्पष्ट केले होते. तथापि, आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएमद्वारे न घेता जुन्याच मतपत्रिका पद्धतीच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी काही विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, आम्ही ईव्हीएमद्वारे विश्वासार्ह, निष्पक्ष, तटस्थ आणि नीतीने निवडणूक घेण्यात नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही अरोरा यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...