नांदेड,दि.10 - नायगावच्या वादग्रस्त तहसीलदार सुरेखा नांदे यांची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे लेखी पत्र जिल्हा मराठी पत्रकार संघाला दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनामुळे मुजोर तहसीलदारावर आता कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नायगाव तालुक्यात मी म्हणेल तोच कायदा समजून गोदावरीच्या वाळूची खुलेआम लूट होत असताना त्याविरुद्ध नाममात्र कार्यवाही करून सत्य व वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित करणा-या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची शिफारस करणे, त्या बातम्या का छापल्या म्हणून बेकायदेशीर नोटिसा बजावून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा उद्योग करणाऱ्या नायगावच्या तहसीलदार रेखा नांदे यांची अनुक्रमे तक्रार निवेदन १४ सप्टेंबर व २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिली होती.
सदरील निवेदनाची जिल्हाधिकारी यानी कुठलीच दखल घेतली नसल्याने गेल्या २८ डिसेंबर रोजी पुन्हा मागील तक्रारींचे स्मरण देउन दिनांक ९ जानेवारी रोजी तहसीलदार श्रीमती नांदे यांच्यावर कार्यवाही करावी करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, यावरही नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी केली नसल्याने नाईलाजाने ९ जानेवारी रोजी साखळी उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले.
आज साखळी उपोषणच्या दुस-या दिवशी १० जानेवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मराठवाडा विभाग प्रमुख विजय जोशी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र संगनवार, प्रल्हाद उमाटे, सुर्यकांत सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकरांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून सदर प्रकरणी चर्चा केली व नायगावच्या वादग्रस्त तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
करुन चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर हुसा प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांचीही भेट घेवून पत्रकार बालाजी हनमंते व पवनकुमार पुठ्ठेवाड यांच्याशी केलेल्या अभद्र व्यवहार प्रकरणी रेती माफियांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, लक्ष्मण भवरे, प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, सुभाष पेरकेवार, पंडीत वाघमारे, लक्ष्मण बरगे, शेषेराव कंधारे, मारोती बारदेवाड, बालाजी हनमंते, साहेबराव धसाडे संदीप कांबळे, प्रशांत वाघमारे, यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.
दरम्यान, या आधी तहसीलदारांनी मेळगाव येथील जप्त रेतीच्या मोजमापात गैरप्रकार केल्या प्रकरणाची चौकशी कंधारचे उपविभागीय अधिकारी बोरकर करत असून पत्रकारांना नोटिसा बजावून धमकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याने नायगावच्या वादग्रस्त तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
No comments:
Post a Comment