पुणे,(अमीर मुलाणी),दि.29ः- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत महसूल विभागापाठोपाठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही आपला ‘नंबर २’ क्रमांक कायम ठेवला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून २०१७ च्या तुलनेत मागील वर्षी लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. दोन वर्षांत तब्बल ८९ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा पोलिस कर्मचारीच ‘चिरीमिरी’ घेण्यात पुढे असल्याचे दिसत आहे.
एखादा किरकोळ अपघात किंवा किरकोळ स्वरूपाच्या कौटुंबिक भांडणाची प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही बाजूंना कायद्याची भीती दाखविली जाते.त्यानंतर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापेक्षा संबंधित प्रकरणे बाहेरच्या बाहेरच मिटविण्यावर पोलिस भर देतात. त्यातूनच ‘तडजोडी’ची भाषा होते आणि दोन्ही बाजूंच्या लोकांकडून ‘चिरीमिरी’ घेत संबंधित प्रकरणावर पडदा टाकला जातो. अशी छोटी-मोठी प्रकरणे अर्थपूर्ण व्यवहार करून मिटवली जातात. मात्र, काही मोठ्या प्रकरणांमध्ये हीच ‘चिरीमिरी’ थेट लाखोंच्या घरात पोचते.
जमिनींच्या संदर्भातील भांडणे, फसवणुकीची प्रकरणे, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, राजकीय, प्रतिष्ठित व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणांची दखल न घेणे, गुन्हे दाखल न करणे, गुन्हा दाखल होऊनही संबंधित प्रकरणांचा तपास न करणे, संबंधितांना अटक न करणे यांसारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी लाच घेण्याचे काम पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केले जाते. याचपद्धतीने पोलिसांकडून लाच घेण्याची २०१७ व २०१८ या दोन वर्षांत ८९ प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये ‘क्लास वन’ पोलिस अधिकाऱ्यांवरील कारवाई काही प्रमाणात वाढली आहे. २०१८ मध्ये ५ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे; तर पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ९० असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.लाचखोर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची वर्गवारी
वर्ष प्रकरणे प्रथमश्रेणी अधिकारी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी खासगी व्यक्तीमार्फत
२०१७ ३५ ०१ ०२ ३६ ०७
२०१८ ५४ ०४ ०३ ४९ ०५
—————
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत पुण्यातील १४ तालुक्यांसह चार जिल्हे येतात. या सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत महसूल विभागानंतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच घेण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. किरकोळ कारणापासून ते एखाद्या मोठ्या प्रकरणासाठी पोलिस अधिकारी-कर्मचारी लाच घेतात. अशा अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या लाचखोरीमध्ये मागील वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे.
– दत्तात्रेय भापकर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
No comments:
Post a Comment