Sunday, 6 January 2019

पाच लाख घेतांना एलसीबी पीआय, एपीआय रंगेहाथ,यवतमाळ जिल्ह्यात ‘खाकी’ बदनाम

यवतमाळ,दि.06 : सदोष दोषारोपपत्र पाठविणे व गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी २५ लाख रुपये लाचेची मागणी केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला तडजोडीअंती पहिला हप्ता पाच लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. अमरावती येथील पथकाने शनिवारी येथील दारव्हा मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ ही कारवाई केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे. .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (४८), सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (३६) व आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नायक सुनील विठ्ठल बोटरे (३८) अशी लाचखोरांची नावे आहे. शनिवारी दारव्हा रोडवरील चिंतामणी पेट्रोल पंपासमोर सुनील बोटरे या पोलीस कर्मचाऱ्याला पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सदर लाच पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकरिता मागणी केल्याचे त्याने एसीबीला सांगितले. गेल्या वर्षी पोलीस व कृषी विभागाने कळंब येथील जिनिंगमध्ये धाड घातली होती. सदर जिनींगमधून बनावट खते, बियाणे व कीटकनाशके असा ६१ लाखांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात कळंब पोलीस ठाण्यात सचिन कावळे, चंद्रशेखर थोटे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. या गुन्ह्यात सदोष दोषारोपपत्र पाठविणे, गुन्ह्याची तीव्रता कमी करणे, जप्तीतील माल सोडणे, अधिक माल जप्त न करणे, कलमे कमी करणे व भावाकडून घेतलेली शेतीची मूळ खरेदी, धनादेश परत करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २० लाख रुपये लाच देण्याचे ठरले होते. दरम्यान थोटे यांनी १५ डिसेंबर २०१८ रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शनिवारी येथील दारव्हा मार्गावरील चिंतामणी पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला. पोलीस नायक सुनील बोटरे याने तक्रारदाराच्या कारमध्ये बसून पाच लाख रुपयांची लाच स्विकारली. सदर पथकाने पोलीस निरीक्षक कुळकर्णी व पोलीस नायक बोटरे यांना ताब्यात घेतले. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे अमरावती येथील पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, श्रीकृष्ण तालन, सुनील वऱ्हाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेष कडू, चंद्रकांत जनबंधू यांनी केली

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...