मुंबई,दि.01 – आजपासून वर्षाचा नवीन महिना, नवीन दिवसाला सुरवात झाली आहे. सोमवारी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतर मध्यरात्री जगभरातून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. मात्र, ३१ डिसेंबरची पार्टी तळीरामांसाठी स्वस्त ठरली आहे. कारण, लवकरच राज्यातील दारू महागणार आहे. उत्पादन शुल्क वाढविण्यात आल्याने राज्यात दारूचे दर आणखी वाढणार आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तळीरामांच्या खिशावरील भार वाढवणारी बातमी आहे. राज्य सरकारने विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विदेशी दारू १८ ते २० टक्क्यांनी महागणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ५०० कोटींचा नफा सरकारला होणार असून सरकारी तिजोरीत ५०० कोटींचा महसूल वाढणार आहे. दरम्यान, मद्याच्या किमतीत कितीही वाढ झाली तरी तळीरामांना याचा काहीही फरक पडत नाही. कारण, दरवर्षी मद्याची विक्री आणि त्यातून मिळणाऱ्या सरकारी महसूलातही भरघोस वाढ होत आहे. मात्र, ताज्या ट्रेंडनुसार विदेशी आणि देशी मद्यापेक्षा बिअरला जास्त पसंती मिळत असल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून येत आहे. मद्यविक्रीच्या भरारीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूलही झपाट्याने वाढतो आहे.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानुसार इंडियन मेड फॉरेन लिकरवर २०१३ पासून शुल्क वाढ करण्यात आली नाही. म्हणून राज्य सरकार आयएमएफएल वर वाढ करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती आहे.
No comments:
Post a Comment