गोंदिया : तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्राम पंचायतीमध्ये जानेवारी २०१८ ते जून २०१८ पर्यत सामान्य निधीतून तसेच १४ व्या वित्त आयोगातून लाखो रूपयांची अनियमितता व नियमबाह्य कामे करण्यात आली आहेत. याला जबाबदार सरपंच व सचिव असून त्यांच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा खंडविकास अधिकारी तिरोडा यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून उपसरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे.
काचेवानी ग्राम पंचायतीमध्ये सरपंच लवंगदास भंडारी व तत्कालीन ग्रामसेवक के.टी.बाळणे यांनी जानेवारी ते जून २०१८ पर्यंत सामान्य निधीतून ४ लाख ७४ हजार १४० तसेच १४ व्या वित्त आयोगातून ३९ हजार ९२१ यासह कचरापेटी खरेदी, कचराकुंडी बांधकाम तसेच आपले सरकार केंद्रावर केलेला खर्च असा एकंदरीत ७ लाख ९४ हजार ६१ रूपयाचे अनियमित व नियमबाह्य कामे केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा खंडविकास अधिकारी तिरोडा यांना उपसरपंच प्रमिला रहांगडाले, ग्रा.प.सदस्य घनश्याम चौधरी, शेवंताबाई चौधरी, दिलवंताबाई रहांगडाले, वंदनाबाई ठोंबरे यांनी दिले आहे. उल्लेखनिय असे की, या प्रकारावरून काचेवानी गावात चांगलेच राजकारण तापले आहे.
No comments:
Post a Comment