Saturday, 5 January 2019

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित ई-भूमीपूजन सोहळ्याला जिल्हातील लोकप्रतिनिधींची दांडी

गोंदिया दि.५.: ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ४ कोटी ९१ लक्ष ३६ हजार रुपये खर्चाच्या १० पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ई-भूमीपूजन करण्यात आले. ई-भूमीपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी येथील सरपंच श्री.बुध्दे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.दरम्यान या कार्यक्रमाला संबधित तालुक्यातील आमदारासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षासह इतर पदाधिकारी यांनी दांडी मारली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एस.के.शेगावकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांचेसह विविध गावातील सरपंच व सचिव उपस्थित होते. नागपूर येथून मुख्यमंत्री यांनी विदर्भातील ८८ कोटी २६ लक्ष ६८ हजार रुपये खर्चाच्या १११ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन केले.
गोंदिया जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यातील खाडीपार, सितेपार, गिरोला. गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, मुरदोली, सोनेगाव. तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, खुरखुडी, खैरलांजी आणि सालेकसा तालुक्यातील निंबा या गावातील पाणी पुरवठा योजनेचे आज ई-भूमीपूजन झाले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने व अर्जुनी येथील सरपंच श्री.बुध्दे यांचेशी थेट संपर्क साधला. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्‍य सचिव श्यामलाल गोयल व विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार नागपूर येथील कार्यक्रमास उपस्थित होते.
महानेटच्या माध्यमातून ३० हजार गावांमध्ये इंटरनेट सेवा पोहचविण्यात आली असून ग्रामपंचायतींना मंत्रालयाशी थेट संवाद साधता येईल. तसेच शाळा व आरोग्य केंद्रांमध्येही ही सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे चांगले शिक्षण तसेच आरोग्य सुविधा सुध्दा उपलब्ध होणार आहे. यावर्षी २३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून सर्व ग्रामपंचायती हरित व स्मार्ट करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणल्या जातील असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना राबवितांना वेळोवेळी पाणी पट्टी वसूल करुन योजना यशस्वीपणे राबवा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...