Tuesday, 22 January 2019

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या, कसनासुरात दहशत


गडचिरोली,दि.२२: नऊ महिन्यांपूर्वी ४० नक्षली ठार होण्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरुन सशस्त्र नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची हत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे. या घटनेमुळे भामरागड तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये मालु दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी यांचा समावेश आहे. तिघांचेही मृतदेह अगदी जवळ भामरागड-आलापल्ली मार्गावरील कोसफुंडी फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
२२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगल तसेच राजाराम खांदला-नैनेर परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ या प्रमुख व जहाल नक्षल्यांचा समावेश होता. या ४० नक्षल्यांच्या हत्येस उपरोक्त तिघेही कारणीभूत असून, त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच ४० नक्षल्यांना जीव गमवावा लागला, त्यामुळे तिघांची हत्या केल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी घटनास्थळाजवळ लावलेल्या बॅनरवर केला आहे. एप्रिल २०१८ मध्ये ४० नक्षली ठार झाल्याचा राग नक्षल्यांच्या मनात होता. त्याचा केव्हा ना केव्हा उद्रेक होईल, याची कल्पना सर्वांना होतीच. परंतु निष्पाप गावकèयांना पोलिस संरक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे तीन जणांना प्राण गमवावा लागल्याची टीका होऊ लागली आहे.
तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एक वेगळीच माहिती पुढे येत आहे. ङ्कशनिवारी(दि.१९) शंभराच्या आसपास सशस्त्र नक्षलवादी कसनासूर गावात गेले होते. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावून ४० नक्षल्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. काही जणांच्या धान्याचीही नासधूस केली. त्यानंतर सोमवारी(दि.२१) गावातील काही वृद्ध नागरिक वगळता शंभराहून अधिक गावकèयांनी आपले गाव सोडून ताडगाव येथील पोलिस मदत केंद्र गाठले. सध्या सर्वजण तेथेच आश्रयाला आहेत. विशेष म्हणजे, नक्षलवादी आपल्यासोबत ६ जणांना घेऊन गेले होते. त्यातील तिघांची त्यांनी आज निर्घृण हत्या केली. उर्वरित तिघेजण नेमके कुठे आहेत, हे समजलेले नाही.
ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडे भाकप(माओवादी)च्या महासचिवपदाची सूत्रे होती.परंतु प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे गणपतीने महासचिवपद सोडल्यानंतर जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली. नंबाला केशव राव हा अतिशय आक्रमक असल्याने आगामी काळात हिंसाचार बळावण्याची शक्यता नक्षलग्रस्त राज्यातील पोलिस व गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. गगन्नाच्या नियुक्तीनंतर गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या हा पहिला मोठा हिंसाचार आहे. विशेष म्हणजे, दक्षिण गडचिरोलीवर कमांड असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिलाही तीन महिन्यांपूर्वीच अबुझमाड भागात पाठविण्यात आले असून, आक्रमक नक्षल नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवादी आगामी काळात मोठा हिंसाचार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...