जागतिक बुद्धिस्ट पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र
मुंबई, दि. 4 : नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही मान्यता देण्यात आली.बुद्धिस्ट सर्कीट अंतर्गत पर्यटन विभागाने नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी-नागपूर, शांतीवन-चिंचोली आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल-कामठीचा समावेश केला आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा विकास करून जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरेल अशी विकास कामे करण्यात येणार आहेत. जगातील विविध भागात असलेल्या बुद्धिस्ट टेम्पलच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडाळाची मान्यता मिळाल्या नंतर अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
या बैठकीला उर्जामंत्री तथा नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री डॉ.सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलींद माने, माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षा शितल उगले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment