Sunday, 21 July 2019

निवडणुका लागताच भाजपचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील : नाना पटोले

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुका लागताच भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते काँग्रेसच्या संपर्कात असून, लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट माजी खासदार नाना पटोले यांनी केला. येथील विश्रामगृहात आज रविवारी (ता. २१) आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. नाना पटोले यांची काँग्रेसने महाराष्ट्र प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी आज, गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली. नाना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात काँग्रेसच्या सुरू असलेल्या योजनांची नावे बदलून तेच पुढे सुरू ठेवले आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम त्यांच्या कार्यकाळात झाले नाही. मागील कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे प्रचारमंत्री म्हणून संपूर्ण कार्यकाळ चालविला. त्यावरही २०१९ ला सत्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागल्याने इव्हीएम सेट करून निवडणूक जिंकली. ही इव्हीएमच्या भरोश्यावर सत्तेत आलेली केंद्राची सरकार आहे. पुढील विधानसभा निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फेे पूर्ण जोमाने लढून जिंकून दाखविण्याचे आमचे प्रयत्न असतील. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. पुढे बोलताना नाना पटोले यांनी भंडारा- गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकाऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही केली. त्यांच्या सोबत कांग्रेसचे प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, के. आर. शेंडे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...