सैन्य भरतीसाठी आवश्यक सर्व परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण
ठाणे,दि.29 - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही होण्यापूर्वी कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये राणे मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या 7 ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्या पुढील ट्रेनिंगसाठी चेन्नईला जाणार आहेत. एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या वीरमरणानंतर स्वतःला सावरणं, त्यातही पुन्हा स्वतः सैन्यात जाण्याचा निर्णय घेणं, त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं, त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं आणि भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांचे निर्णय अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत.
देशासाठी सैन्य दलात भरती होण्याची लहानपणा पासुनच आवड होती. कौस्तुभला देशासाठी अजुन खुप काही करायचे होते. त्याचे स्वप्न लष्करात जाऊन मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं कनिका म्हणाल्या . आपलं लहान मुल आणि पत्नी मागे असताना देखील कौस्तुभने आधी देशाचा विचार केला. आपल्या वडिलांनी देशासाठी सैन्यात दाखल होऊन जे केले ते लहानगा अगस्त्य पाहु शकला नाही. पण आपली आई देशासाठी सैन्यात दाखल होऊन काय करतेय हे तो प्रत्यक्ष पाहिल तेव्हा त्याला सैनिक काय हे कळेल असं कनिका म्हणाल्या.
No comments:
Post a Comment