नक्षल बॅनरची होळी करत नक्षलवाद मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
गडचिरोली,दि.28 - उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोमके जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसुर रोडवर ताडगुडा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी बॅनर लावले होते. मौजा ताडगुडा व मौजा कसुरवाही येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली.
यावेळी उपस्थित तरुणांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध असल्याचे तरुणांनी सांगितले.आपल्या आदिवासी बांधवावर नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली अनन्वित अत्याचार करत असल्याचे सांगत यापुढे आदिवासी तरुण हे खपवून घेणार नाही असे तरुणांनी स्पष्ट केले.
गडचिरोली पोलीस दलाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २८ जुलै ते ३ ऑगस्ट रोजी 'आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, युवकांची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याबाबत पाठपुरावा त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदत करणार आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी घराबाहेर पडून आपल्या व आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गडचिरोली पोलिस दल ठिकठिकाणी राबवित असलेल्या 'आदिवासी विकास सप्ताहात' सामील व्हावे, असे आवाहन मा.पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment