Saturday, 27 July 2019

चक्क शालेय विद्यार्थीच झाले गावचे कारभारी...!

देवरी तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम

सुरेश भदाडे

देवरी,दि.27-  अतिदुर्गम आणि मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील ओवारा येथील ग्राम पंचायतीचा कारभार हाकण्यासाठी चक्क शालेय विद्यार्थी हेच एक दिवसाचे कारभारी झाले. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राज्यातील पहिला असावा, असे मत उपसरपंच कमल येरणे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागाचा कारभार हाकण्याची जबाबदारी ही त्या गावच्या ग्रामपंचायतीवर असते. यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुक घेऊन निवडणुक आयोग लोकप्रतिनिधींची निवड करीत असते. या लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांना विचारात घेऊन गावाचा विकास करावयाची जबाबदारी असते. मात्र, स्थानिक राजकारणामुळे या लोकनियुक्त प्रतिनिधींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या राज्यघटनेत ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त आहे. गावाच्या विकासाचा आराखडा हा लोकांच्या सहमतीने ग्रामसभेत मंजूर करावयाचा असतो. मात्र, आज देखील ग्रामीण भागात अशा ग्रामसभांना लोकांची उपस्थिती नगण्य असते. यामध्ये सुधार करण्याची गरज असल्याचे मत ओवारा येथील उपसरपंच कमल यांनी व्यक्त केली.
यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना  हा अनुभव येण्यासाठी गावचे सरपंच हिरामण टेकाम यांचे सह सर्व सदस्यांनी प्रस्ताव पारीत करून एक दिवसाचा कारभार हा शालेय विद्यार्थ्यांना सोपवून त्यांच्यामध्ये ग्राम विकासाची जाणीव निर्माण करून विकास कामात येणाऱ्या अडचणींची जाणीव निर्माण करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला..
हा निर्णय अमलात आणण्यापूर्वी शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणुक घेण्यात आली. यामध्ये महिलांसाठी सुद्धा 50 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत सरपंच म्हणून निलेश कोडवते, उपसरंपच म्हणून साक्षी बिसेन या निवडून आल्या. इतर सदस्यामध्ये प्रेरणा मेश्राम, सोनल खरवडे, प्रशांत गजभिये, दिनेश तुरकर, मनिषा भिमटे,संध्या टेकाम, सोहीत ऊईके आणि दुर्गा बिसेन विजयी झाले.
या नवनियुक्त शालेय गावपुढाऱ्यांनी 24 जुलै रोजी एक दिवस ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. सरपंच निलेश कोडवते, उपसरपंच साक्षी बिसेन यांनी सर्व सदस्यांसह गावाची संपूर्ण पाहणी केली. यानंतर झालेल्या सभेत गावातील समस्यांवर गंभीर चर्चा करण्यात आली. या सभेच पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, ग्रामीणांचे आरोग्य, रस्ते विकास, सांडपाण्याची विल्हेवाट, गटारे आदी विषयांवर अनेक प्रस्ताव पारित केले.
गावचे सरपंच टेकाम आणि उपसरपंच येरणे यांनी एकदिवसाच्या कार्यकारिणीने गाव विकासासंबंधी घेतलेले निर्णयांवर अमलबजावणी करण्याचे आश्वासन समस्त ओवारा वासियांना दिले. या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...