मुंबई-सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपांवरून घरचा रस्ता दाखविण्यात आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धक्का दिल्याचे मानले जाते. खडसे समर्थक व विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कापून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकाला भाजपने शेवटच्या क्षणी बुधवारी उमेदवारी जाहीर केली. ‘भाजपचा सक्रिय सदस्य नसलेल्याला उमेदवारी देऊन पक्षाने साधनशुचिता जपली आहे’ अशा शब्दांमध्ये खडसे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास १५ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना भाजपने चंदू पटेल यांची उमेदवारी जाहीर करून खडसे यांना मोठा दणकाच दिला. जळगाव म्हणजे खडसे हे भाजपमध्ये वर्षांनुवर्षे समीकरण होते. याला छेद देत पक्षाने खडसे यांचे जळगाव जिल्ह्य़ातील विरोधक व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कलाने घेतले आहे.
पक्षाने उमेदवारी दिलेले पटेल हे महाजन यांचे समर्थक मानले जातात. खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजन यांना जवळ केले आहे. फडणवीस आणि महाजन या दुकलीने खडसे यांचा पद्धतशीरपणे काटा काढल्याचे चित्र समोर आले आहे.
‘खडसे मंत्रिमंडळात परतल्यास आनंदच होईल’, असे विधान चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. हे विधान ताजे असतानाच खडसे यांचा पद्धतशीरपणे काटा काढण्यात आला. उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्यानेच विद्यमान आमदार आणि खडसे यांचे निकटवर्तीय जगवानी यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला होता. भाजपने पटेल यांना उमेदवारी जाहीर केल्याने जगवानी यांना माघार घ्यावी लागेल. चंदू पटेल हे जळगावमधील बडे प्रस्थ समजले जाते.
महाजन यांच्याशी सूत जमवून त्यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. खडसे यांचे ज्या पद्धतीने खच्चीकरण करण्यात येत आहे यावरून त्यांचे राजकीय भवितव्य कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत. राजीनाम्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने लक्ष्य आहे त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस हेसुद्धा नाराज झाल्याचे समजते. यातूनच खडसे यांची पद्धतशीरपणे कोंडी करण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपमध्ये आतापर्यंत सक्रिय सदस्याला निवडणुकीत उमेदवारी दिली जात असे. पक्षाने उमेदवारी दिलेले पटेल हे व्यवसायाने बिल्डर असून, कधीच पक्षाचे सक्रिय सदस्य नव्हते. पक्षाने बहुधा नवा पायंडा पाडला असेल. सिंधी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जगवानी यांनाच फेरउमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, मला पक्षाचा निर्णय मान्य आहे. – एकनाथ खडसे, माजी मंत्री

No comments:
Post a Comment