Wednesday 19 October 2016

गोळ्या झाडून गोंदियात प्रेमी युगुलाची आत्महत्या

युवक-युवती उच्च्शिक्षित : नवाटोला नजीकची घटना : संभ्रम कायम
 गोंदिया,दि.19  : अभियांत्रिकीनंतर युपीएससीची तयारी करण्याकरिता पुण्याला गेलेली मुलगी तर रेल्वेचा लोकोपायलट म्हणून रुजू होण्याच्या तयारीत असलेल्या गोंदियाच्या आंबाटोली परिसरातील प्रेमीयुगलाचे मृतदेह आज बुधवारला आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.दरम्यान त्यांची आत्महत्या की हत्या या चर्चांना उधाण आले आहे.
 दोघेही गोंदिया शहरातील आंबाटोली परिसरात एकमेकासमोरील घरात राहत होते. काल मंगळवारी दुपारपासून ते बेपत्ता होते. त्यांचे मृतदेह गोंदियावरून सुमारे सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या नवाटोला(घिवारी) परिसरात आज बुधवारी सकाळी आढळून आले. मुलगा आणि मुलीच्या डोक्यावर बंदुकीची गोळी झाडण्यात आली. घटनास्थळावरून देशी कट्टा हस्तगत करण्यात आला. दोघांनीही आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. मुलाचे नाव अंकीत वैद्य(वय २८), तर  मुलीचे नाव काजल मिलिंद मेश्राम(वय २२) असे आहे. 
सविस्तर असे की, काजल मेश्राम हिने गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याकरिता पुणे येथे गेली. दिवाळी असल्यामुळे ती गोंदिया येथे आली होती. तर अंकीत वैद्य याचे शासकीय नोकरीकरिता प्यरत्न सुरू होते. त्याने नुकतीच रेल्वेमध्ये पायलटची परिक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण झाला होते, असे समजते. दोघेही आंबाटोली परिसरात राहत होते. तेदोघेही मंगळवारी दुपारपासून घरून बेपत्ता होते. सायंकाळपर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा पत्ता लागला नाही. आज घरची मंडळी पोलिसांत तक्रार देण्याच्या तयारीत असतानात घिवारीनजीक असलेल्या कालव्याशेजारी एक मुलगा आणि मुलीचा मृतदेह असल्याची माहिती त्यांनी मिळाली. घरच्या मंडळीने जावून बघितले असता ते काजलअणि अंकीत असल्याचे आले. याची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली. काजलचा मृतदेह धान असलेल्या बांधीत पडलेला होता. तिच्या डोक्यावर बंदुकीच्या गोळीचे निशाण होते. तर अंकीतला देखील गोळी लागली होती. तो काजलपासून पाच फूट अंतरावर पडून होता. अंकीतच्या जवळ देशी बनावटीची बंदुक पडली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधण्यात येत होता. घटनास्थळावर असलेल्या नागरिकांच्या सांगण्यानुसार ते दोघेही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याच परिसरात सायंकाळी किंवा दुपारी फिरताना आढळून आले. मृतदेहाशेजारी एक दुचाकी देखील आढळली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकीतच्या खिशात एक कागद आढळून आला.त्यात आई मला माफ कर, मला काजलने धोका दिला, असे लिहीले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक जयदीप रणवरे, रावणवाडीचे पोलिस निरीक्षक गावडे,गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र  शुक्ला आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

हत्या की, आत्महत्या
काजल आणि अंकीत यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. मात्र, ते दोन्ही शिकणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडे बंदुक कुठून आली. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे जर त्यांचे प्रेमसंबध तुटले होते, तर दोन ते तीन दिवस ते सोबत कसे होते आणि घटनेच्या दिवशी देखील ते सोबत कसे होते. असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

तथाकथीत वाळू माफियांचा हात ?
घटना घडली त्या परिसरात वाळू माफियांचे साम्राज्य आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच भागात वाळू माफियांनी गावक्यांवर बंदूक रोखली होती. आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर बंदुक देखील जप्त केली होती. त्यामुळे  कदाचित हे दोन्ही  प्रेमी युगुल एकांतात बसले असावे आणि अज्ञात आरोपींनी त्यांची छेडछाड केली असावी आणि याची वाच्यता होऊ नये, म्हणून बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केली आसावी, अशीही चर्चा घटनास्थळावर होती. जिल्ह्यात  प्रेम प्रकरणातून अनेकांनी आत्महत्या केली. परंतु, बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे शंका कुशंकांना पेव फुटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...