Monday 31 October 2016

तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार

वृत्तसंस्था भोपाळ, दि. ३१ - सुरक्षा रक्षकाची हत्या करुन भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी मध्यप्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. भोपाळ कारागृहापासून १० किमी अंतरावर अचारपुरा गावाजवळ ही चकमक झाली.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाची हत्या करुन हे दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. मध्यवर्ती कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये या आठही दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पलायनासंबंधी मध्यप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे.
त्यांनी स्टीलच्या प्लेटने सुरक्षा रक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरींच्या सहाय्याने भिंत चढून त्यांनी पलायन केले. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती भोपाळचे डीआयजी रमन सिंह यांनी दिली. पळालेल्या आठ दहशतवाद्यांमध्ये जाकीर मेहबूब शेख आणि अमजद यांचा समावेश असून, ते २०१३ मध्येही कारागृहातून पळाले होते.
सिमीचे दहशतवादी मध्यप्रदेशातील कारागृहातून पळून जाण्याची ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. स्नानगृहाच्या खिडकीला असलेल्या सळया तोडून या दहशतवाद्यांनी पलायन केले होते. मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या मध्यवर्ती कारागृहातून या दहशतवाद्यांनी अशा प्रकारे पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...