Monday 31 October 2016

‘जलयुक्त’मधून एक लाख ४५ हजार टीसीएम पाणीसाठा

पुणे दि. 31: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. अभियानातून राज्यभरात तब्बल एक लाख ४५ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी असलेली टंचाई कमी होऊन हजारो हेक्टरला फायदा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
 
पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड, यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाला होता. त्याचप्रमाणे राज्यातील बहुतांशी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने योग्य पाऊले उचलत जलसंधारणाची कामे हाती घेतली. गेल्या दोन वर्षांत १८ हजार ५६८ गावांमध्ये सिंमेट साखळी बंधारे, जुन्या अस्तित्वातील सिंमेट नालाबांध, केटी वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्राेतांतील गाळ काढणे, जलस्राेत बळकटीकरण करणे, विहीर पुनर्भरण, अशी विविध कामे हाती घेण्यात आली होती. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. 
 
गेल्या वर्षी ९ हजार ७५३ गावांमध्ये शासकीय व लोकसहभागातून १५ हजार ७९८ गावात कामे केली. त्यातून सुमारे एक लाख सात हजार घनमीटर गाळ काढला होता. त्यासाठी तब्बल ६५९ कोटी रुपये खर्च झाला अाहे. त्यात सुमारे एक लाख ७ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला. यंदा ८ हजार ८१५ गावांत चार हजार २४२ कामे केली आहेत. त्यातून ३७ हजार ९५० घनमीटर एवढा गाळ काढला असून, त्यावर १७२ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...