अर्जुनी/मोरगाव,दि.३ : समाजातील गरजू लोकांना शामरावबापू कापगते यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा समाजाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. दुष्काळाच्या काळात सुध्दा त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मदत केली. ते संस्कारीत असल्यामुळेच त्यांनी समाजातील गरजवंतांना मदत केली. आज अशाप्रकारच्या संस्कारीत माणसाची गरज आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
३ जानेवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव (शिरोली) येथील श्यामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयात शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा श्री.बागडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, दिनेशभाई पटेल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.गजानन डोंगरवार, ऋषी शहारे यांची उपस्थिती होती.
आणीबाणीच्या काळात शामरावबापूंनी कारावास भोगल्याचे सांगून श्री.बागडे म्हणाले, १९७२ च्या दुष्काळात सुध्दा त्यांनी लोकांना मदत केली. समाजासाठी काम करीत असतांना त्यांनी वेळेचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी सुध्दा विद्यार्थी जीवनात वेळेचे नियोजन करुन यश संपादन करावे. स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यविषयक शिक्षण घ्यावे. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आता उत्पन्नाची मर्यादा देखील वाढविण्यात आली आहे. अपघात विमा योजना, अटल पेंशन योजना याचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते सेवाव्रती पुरस्कार डॉ.देवाशिष चॅटर्जी (गोंदिया), गोरक्षा पुरस्कार नमुदेव ठाकरे (माहुरकूडा), संभा पंधरे (शिरोली), श्रमिक पुरस्कार किसन सूर्यवंशी (शिरोली), ल.वा.भोयर (मडेघाट), युवा पुरस्कार माधुरी वैद्य (दिघोरी/मोठी), वनश्री पुरस्कार शरद भुजाडे (पिंडकेपार), शिक्षक पुरस्कार अंगेश बेहलपांडे (लाखोरी), हेमराज हेमने, रामकृष्ण परशुरामकर, पंढरी दुधबरे, कला पुरस्कार मुलचंद गहाणे, कृष्णा किरसान, साहित्य पुरस्कार बंडोपंत बोडेकर (चंद्रपूर), डॉ.चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), पत्रकारिता पुरस्कार अमरचंद ठवरे (बोंडगाव/देवी), आत्माराम मस्के (शिरोली), जीवन गौरव पुरस्कार डॉ.विलास डांगरे (नागपूर), मातोश्री पुरस्कार विशाखा गुप्ते (भंडारा), खेळाडू पुरस्कार शशीकला आगाशे, शेती पुरस्कार राजेंद्र सांभारे व अलका दुधबरे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी डॉ.हेमकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘हाती घे मशाल‘ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड.मनीष कापगते यांनी मानले.
No comments:
Post a Comment