मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१५ साली सरफेस बुक हे मॉडेल लाँच केले होते. आता याची पुढील आवृत्ती सरफेस बुक २ प्रो या नावाने बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे. या माध्यमातून अॅपलच्या मॅकबुक प्रो या मॉडेलला जोरदार टक्कर देण्याचा मायक्रोसॉफ्टचा इरादा असल्याचे दिसून येत आहे. हा लॅपटॉप १३.५ आणि १५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील १३.५ इंची मॉडेलमध्ये ३००० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा, ३:२ अस्पेक्ट रेशो असणारा आणि पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल. तर १५ इंची मॉडेलमध्ये ३४०० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अनुक्रमे सातव्या पिढीतील कोअर आय५-७३००यू आणि आठव्या पिढीतील कोअर आय७-८६५०यू हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० आणि जीटीएक्स १०६० या ग्राफीक्स कार्डची जोड देण्यात आलेली असेल. यात ८ आणि १६ जीबी रॅमचे पर्याय असतील. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत.
सरफेस बुक २ प्रो या मॉडेलमध्ये अत्यंत दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १७ तासांपर्यंत चालत असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. दोन्हींमध्ये फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. डॉल्बी ऑडिओ प्रिमीअमसह यात स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच यात अतिशय उत्तम दर्जाचे दोन मायक्रोफोनही असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आणि एक्सबॉक्स वायरलेसचा इनबिल्ट सपोर्ट असेल. यासोबत दोन युएसबी ३.० टाईप-ए पोर्ट, एक युएसबी टाईप-सी पोर्ट, कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदींची सुविधादेखील असेल. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, मॅग्नेटोमीटर व अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यात सरफेस पेनच्या मदतीने रेखांकन करता येईल. विशेष म्हणजे याला सरफेस डायल या उपकरणाचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.
सरफेस बुक २ प्रो हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. अर्थात ते लॅपटॉप तसेच (कि-बोर्ड काढून) टॅबलेट म्हणूनही वापरता येणार आहे. हे मॉडेल लॅपटॉप, टॅबलेट, स्टँडर्ड आणि व्ह्यू मोड या चार प्रकारांमध्ये वापरता येतील. हा लॅपटॉप ६४ बीट विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असेल. यात मायक्रोसॉफ्टचे सर्व प्रॉडक्टिव्हिटी टुल्स वापरता येतील. याच्या मदतीने थ्री-डी मॉडेलींग, गेमिंगचा आनंद घेता येईल. याला विंडोज मिक्स्ड रिअॅलिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष करून डिजीटल आर्टीस्ट आणि प्रोफेशनल्ससाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील अनेकविधी सरस फिचर्समुळे हा लॅपटॉप संगणकापेक्षाही गतीमान व उपयुक्त असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आले नसून ९ नोव्हेंबरपासून याची नोंदणी सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment