मुंबई,29-संपर्क – संवाद – सेवा हा भाजपाचा आत्मा आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना उत्सव साजरा करू नये तर लोकांशी संपर्क साधावा. सरकारच्या कामांचा हजारो लोकांना लाभ झाला आहे. त्यांच्याशी संवाद साधावा. आपल्या सरकारने केलेली कामे कार्यकर्त्यांनी लोकांना आवर्जून आणि आत्मविश्वासाने सांगावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असून केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेल्या विश्वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात, वॉर्डावॉर्डात जाऊन आपल्या सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. सरकारची कामे सांगताना कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधा, असा संदेश प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी दिला. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत भाजपाला राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी भाजपाला स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व विकासाचे नवे पर्व देशात सुरू केले. भाजपाच्या राज्य सरकारनेही त्याच मार्गाने काम केले आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात विषारी प्रचार केला तरीही सामान्य माणसाने पक्षाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, आपल्या सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने जिल्हा, तालुका आणि गावाच्या स्तरावर लोकांशी संपर्क साधून सरकारची कामे सांगावित. लोकांनी भाजपाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविला आहे. सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असताना आपल्या सरकारची कामे सांगण्यासाठी छोट्या समुहांच्या बैठका आयोजित करून लोकांशी संवाद साधावा. मा.वी. सतीश यांनी सांगितले की, देशाच्या विकासाची व राजकारणाची दिशा ठरविण्याच्या स्थितीत भाजपा आला आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. पारदर्शी सरकारच्या बाबतीत आपल्या सरकारने मोठे परिवर्तन घडविले आहे. सरकारच्या सर्व कामांची नोंद घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवा. पक्षाच्या राज्यस्तरीय विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर व डॉ. रामदास आंबटकर तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार आणि ठाणे भाजपा अध्यक्ष खा. कपिल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मोर्चे व आघाड्यांचे प्रदेश संयोजक तसेच जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
No comments:
Post a Comment