पवनी,दि.03: महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन हे बंड नव्हते. भारतीयांना गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठीची ती चळवळ होती. शासनाद्वारे चुकीचे काम, चुकीचे धोरण याविरुद्ध बोलणे हे बंड नाही. समाजाला कडू औषधाची गरज आहे. त्याशिवाय शिस्त लागणार नाही. खासदारकीची खुर्ची नाना पटोलेंची नाही तर ती जनतेची आहे. जनतेच्या प्रेमामुळे मला ही खुर्ची मिळालेली आहे. शासनाने शेतकर्यांना कर्जमाफी देताना सरसकट द्यावी. त्यांचा अंत पाहू नये. आता चावडी वाचन करून कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम ही शेतकर्यांची थट्टा असल्याचा आरोप खासदार नाना पटोले यांनी केला.
पवनी नगर परिषदतर्फे आयोजित ‘स्वच्छता हीच सेवा मोहिमे’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पुनम काटेखाये या होत्या. यावेळी अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, माजी नगराध्यक्ष रघुनाथ पिपरे, युवाशक्तीचे देवराज बावनकर, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी सभापती हंसा खोब्रागडे, डॉ.अनिल धकाते मंचावर होते.
यावेळी खा.पटोले म्हणाले, पवनी नगर पालिकेला १६१ वर्ष पूर्ण झाली तरीही आपण विकासासाठीच प्रयत्नशील आहोत. विकास केव्हा होणार असा प्रश्न पडला असेल. नागपूरप्रमाणे आपल्याही भागाचा विकास करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.
भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्हे महाराष्टÑाच्या इतिहासात पुढच्या वर्षात विकासशील जिल्हे म्हणून उदयास येणार आहेत असे प्रतिपादन केले. शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलण्याची हिंमत राजकारणी लोकांनी ठेवली पाहिजे. जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यापारी, शेतकरी व सामान्य जनतेचे हाल झाले आहे. अर्थतज्ज्ञ चिंता व्यक्त करु लागले आहेत. गॅस सबसीडी बंद करण्याचे धोरण सरकारकडून सुरु आहे. पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक बनविण्याची वेळ आमच्या ग्रामीण भागातील भगिणींवर येणार आहे. सर्वांनी सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे असे प्रतिपादन करुन नागपूरच्या घाण पाण्यापासून आम्हाला वाचवा, असा टोलाही खासदार पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.याप्रसंगी बोलताना आ.डॉ. परिणय फुके म्हणाले, पवनी नगरात ई-लायब्ररीसाठी ७० लाख रूपये निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली.आ. रामचंद्र अवसरे यांनी पर्यटन क्षेत्र म्हणून पवनीचा लाौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी पवनीच्या विकासाकरिता आराखडा तयार असून शासनाचा निधी मिळाल्यास नगराचा विकास करता येईल असा आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन व आभार प्रशासन अधिकारी अरविंद चिलबुले यांनी केले.
No comments:
Post a Comment