सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा
गोंदिया,दि.२८ : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्य देण्यात येते. या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करणार असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रास्तभाव दुकानातून धान्य घेणाऱ्या अंत्योदय व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.भंडारी, गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, अन्न ही मुलभूत गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभापासून गरजू व पात्र असलेला लाभार्थी हा वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.
जिल्ह्यात ई-पॉसच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण होत असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यालाच हे धान्य मिळत असल्याचे समाधान व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, आता लाभार्थ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे कशा मिळतील याचे नियोजन करण्यात येत आहे. विविध योजनांचा त्यांना लाभ मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावून ते दारिद्रय रेषेच्यावर कसे येतील यादृष्टीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करणार असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, मेळाव्याच्या आयोजनानंतर निश्चितच त्यांना आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ मिळालेला असेल असे नियोजन करण्यात येईल. पुरवठा विभागाने योजनांचा या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्याला सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७७ हजार १८१ अंत्योदय योजनेचे लाभार्थी असून त्यांना २ रुपये प्रति किलो दराने तांदूळ व ३ रुपये प्रति किलो दराने गहू देण्यात येतो. एप्रिल २०१७ पासून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती श्री.सवाई यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment