Saturday 28 October 2017

मोदींना पर्याय नाही हा भ्रमच, देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न


sharad-yadavdfag_20171023997

मुंबई,दि.28(वृत्तसंस्था) : देशात नरेंद्र मोदींना पर्यायच नाही हा भ्रम आहे. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या तीन वर्षांपासून पद्धतशीरपणे हा भ्रम पसरविण्याचे काम केल्याचा आरोप संयुक्त जनता दल (जेडीयू)चे बंडखोर नेते शरद यादव यांनी शुक्रवारी केला. मागील लोकसभा निवडणुकीत फक्त ३१ टक्के मतांच्या जोरावर मोदी सत्तेपर्यंत पोहोचले. मात्र त्या निवडणुकीतही त्यांच्या विरोधात ६९ टक्के मते पडली होती, असा दावा त्यांनी केला.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘सांझी विरासत बचाओ’ अभियानात यादव बोलत होते. जेडीयूच्या शरद यादव यांच्या नेतृृत्वाखाली सध्या देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. षण्मुखानंद येथील आजच्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, सीपीआयएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपाचे अबू आझमी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी १७ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी शरद यादव म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले भाजपा सरकार गाय, घरवापसी आणि लव्ह जिहादसारख्या विषयांत अडकले. धर्माच्या नावावर लोकांची माथी भडकविण्याचे काम सुरू आहे. ७० वर्षांत पहिल्यांदाच ताजमहालवरूनही वादंग निर्माण झाला, अशी परिस्थिती देशात यापूर्वी कधीच नव्हती, असे सांगत भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही यादव यांनी या वेळी केले.
संविधान वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले. केंद्रातील भाजपा सरकार फक्त मालक वर्गाचे आहे. त्यामुळे कामगार, मजूर आणि कष्टकरी वर्ग आपल्या बाजूने आहे. नोटाबंदी लागू करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था काळ्या पैशावर चालते, असे सांगून कष्टकºयांचा अपमान केला आहे. तसेच आता जीएसटीच्या नावाखाली करदहशत माजविण्यात येत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. तर धर्माच्या नावावर देशाचे नागरिकत्व ठरविण्याचा खटाटोप भाजपा सरकार करीत असून विधेयक आणण्याची तयारी सरकारने चालविल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला. व्होट बँकेच्या राजकारणासाठी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत आहे. भारतीयत्वाच्या रक्षणासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी म्हणाले.
> राजू शेट्टी आणि अबू आझमी यांचाही मोदींवर निशाणा
राजू शेट्टी आणि अबू आझमी यांनी मोदींवर निशाणा साधतानाच काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला. काँग्रेसने नीट राज्य केले असते तर आज विरासत वाचविण्यासाठी जमण्याची वेळ आली नसती. सत्ता नसली की काँग्रेसला धर्मनिरपेक्ष आणि छोट्या पक्षांची आठवण येते. सत्तेत आल्यावर मात्र या पक्षांना संपविण्याचा कार्यक्रम राबविला जातो. या धोरणामुळेच देशात काँग्रेसची ही अवस्था झाली आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तर, आता एकत्र येण्याची भाषा करणारी काँग्रेस निवडणुका आली की स्वबळाची भाषा करते. अशा धोरणाने भाजपाला रोखता येणार नसल्याचे अबू आझमी म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...