गोंदिया,दि.28 : शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली. या सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी पाचही विषयांना एकमताने मंजुरी दिली.विशेष म्हणजे आजपर्यंत कधीही एवढी पोलिसांची संख्या परिषदेत आयोजित सभेला घेऊन बघितली गेली नव्हती.त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या पत्रपरिषदेमुळे सत्ताधारी पक्ष घाबरल्याचे व सत्तेचा उपयोग करुन पोलिसांचा वापर केल्याचे बघावयास मिळाले.
विरोधी पक्षातील सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निवडीच्या विषयाला घेऊन उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती लावली आहे. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या आमसभेनंतर एकही सभा घेता आलेली नाही. दरम्यान न्यायालयाने सभेसाठी मंजुरी दिल्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शुक्रवारी (दि.२७) शहराशी निगडीत पाच महत्वपूर्ण विषयांना घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. या सभेमध्ये आरोग्य विभागातंर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता कीटकनाशक फवारणीकरिता कमी दर मंजूरी, नगर परिषद क्षेत्रातील भकट्या कुत्र्यांची नसबंदी, बेवारस डुकरांचा बंदोबस्त, बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी आणि नगररचना विभागांतर्गत नगर परिषदेच्या मालकीची जागा भूखंड क्रमांक ३०-३ व १२३ मधील क्षेत्र पोलीस स्टेशन रामनगर व कर्मचारी वसाहतीकरिता हस्तांतरीत करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार, शुक्रवारी १२.१५ वाजता नगराध्यक्षांच्या परवानगीने सभेची कारवाई सुरू झाली. मांडण्यात येणारे विषय शहरासाठी महत्वाचे असल्याने उपस्थित नगरसेवकांनी सर्वच विषयांना एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे पाच मिनिटांतच सभा आटोपली.
शुक्रवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता सभागृहात सुमारे ३० सदस्य हजर असल्याने व कोरमची पूर्तता झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. सभेला उपस्थित सर्वच सदस्यांनी एकमताने विषयांना मंजुरी दिली. त्यामुळे सभा लवकर संपली. त्यानंतर गोंदिया परिवर्तन आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे, पंकज यादव, लोकेश यादव, ललिता यादव सचीन शेंडे यांच्यासह अन्य सदस्य सभागृहात पोहचले. मात्र तोपर्यंत सभा आटोपली असल्याचे पाहून आघाडीचे सदस्य नाराज झाले. किमान काही वेळ तरी त्यांनी वाट बघायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment