Tuesday 24 October 2017

माध्यमांचा अंकूश महत्वाचा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Hon CM at Amravati Patrkar Bhavan Inaugaration-2
अमरावती, दि. 23 : लोकशाहीतील सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही, म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वोतोपरी सहकार्य करत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. सरकार सरकारचे कर्तव्य करीत आहे. माध्यमांनी माध्यमांचे कर्तव्य बजावत राहावे. प्रत्येक कर्तव्यामागे स्वहिताची नव्हे तर समाजहिताची आणि देशहिताची भावना असली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमरावती येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित पत्रकार भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनिल देशमुख, डॉ. अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती
होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, सकाळ व साम टीव्हीचे समूह संपादक राहुल गडपाले,उद्योजक नरेंद्र भाराणी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आदी यावेळी व्यासपीठावर होते.
अमरावती जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्याने राज्याला व देशाला अनेक चांगले पत्रकार दिले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत येथील पत्रकारांचा वाटा मोठा आहे. एका अर्थाने अमरावती हे पत्रकारितेचे माहेरघरच म्हणावे लागेल. पत्रकार भवनाच्या नूतन वास्तूबद्दल बोलतांना ते म्हणाले की, या भवनात अद्यावत ग्रंथालय सुरु करावे, त्यासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल.
पत्रकारीता क्षेत्रात 40 वर्षांपासून अविरत सेवा देणारे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, सकाळ व साम टीव्हीचे समूह संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी केले.कार्यक्रमाला मोठया संख्येने पत्रकार व नागरिक उपस्थित होते.तत्पुर्वी मुख्यमंत्री यांनी शहरातील वालकट कंम्पाउंड येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे फित कापून उदघाटन केले. यावेळी त्यांनी भवनाची पाहणी करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...