आधार क्रमांक असेल तरच धान्य पुरवठा
गोंदिया,दि.४ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून योग्य व पात्र लाभार्थ्याला रास्तभाव दुकानातून धान्य वितरीत करण्यासाठी पॉस मशीनचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९९८ रास्तभाव दुकानातून संबंधित लाभार्थ्यांना पॉस मशिनच्या आधारे धान्य वितरीत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाच्या अंतिम टप्प्यात शिधापत्रिकांचे आधार सिडींग करण्याचे काम सुरु आहे. यापुढे ही प्रणाली आधार क्रमांकावर आधारीत राहणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक असणे अनिवार्य आहे. आधार क्रमांक नसेल अशा शिधापत्रिकाधारकाला अथवा कुटूंबातील सदस्याला धान्य मिळणार नाही.
प्रत्येक रास्तभाव दुकानातून धान्याचे वितरण हे पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राहणार आहे. रास्तभाव दुकानातून दुकानात गेल्यावर शिधापत्रिकाधारकाने त्याच्या नावासमोर अथवा कुटूंबातील जी व्यक्ती धान्य घेण्यास गेली असेल त्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा वापर करावा. जेणेकरुन आधार क्रमांक जुळत असल्याची खात्री होईल.
शिधापत्रिकाधारकाने रास्तभाव दुकानात गेल्यानंतर त्याचा अंगठा/बोट स्वच्छ आहे याची खात्री करावी. त्यानंतरच मशीनवर बोट लावावे. त्यामुळे नावाची ओळख पटू शकेल. ज्यांच्या नावाची शिधापत्रिका आहे त्याच व्यक्तीने अथवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने रास्तभाव दुकानात धान्य घेण्यास जावे. इतर कुणासही पाठवू नये. रास्तभाव दुकानातून धान्याचे वितरण केवळ पॉस मशीनद्वारेच होणार असल्याची नोंद सर्व शिधापत्रिकाधारकांनी घ्यावी. ज्यांनी अद्याप आधार क्रमांक जमा केले नसतील त्यांनी त्वरीत आपले आधार क्रमांक रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावे.
जिल्ह्यात ९९८ रास्तभाव दुकाने असून अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना गहू २ रु.दराने, तांदूळ ३ रु.दराने प्रती किलो असा एकत्रीत ३५ किलो दरमहा देण्यात येतो. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गटाचे लाभार्थी गहू २ रु.किलो व तांदूळ ३ रु.किलो याप्रमाणे प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देण्यात येते.
जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप देखील आधार क्रमांक दिले नसतील त्यांनी त्वरीत संबंधीत तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात किंवा गावातील रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment