गोंदिया,दि.०३(खेमेंद्र कटरे)– अभद्र युती करण्यात अग्रेसर असलेल्या गोंदियाच्या राजकारणात येत्या १५ तारखेला बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. जि.प.सभागृहात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. यामुळे राष्ट्रीय तथा प्रांतीय राजकारणात हाडवैरी असताना सुद्धा गोंदिया मध्ये भाजप आणि काँग्रेस पक्ष मांडीला मांडी लावून बसण्याचा इतिहास आहे. राष्ट्रीय पातळीवर हेवीवेट समजले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या साम्राज्याला खिंडार पाडण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात दिलजमाई केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भंडाèयाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकला असला तरी त्यांनी आपली राजकीय दिशा अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. परंतु, गुजरात विधानसभा निवडणुकीतील वातावरणावरून ते स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडीमुळे गोंदिया जि.प. मध्ये भाजप काँग्रेसला वाडीत टाकत राष्ट्रवादीच्या खांद्यावर स्वार होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर राष्ट्रवादीच्या काहींच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीचीच युती पक्की आहे. कारण राष्ट्रवादीकडे असलेला उमेदवार अध्यक्ष पदासाठी हवा तसा सक्षम नसल्याने काँग्रेसला अध्यक्ष पद व राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद यावर जवळपास गोंदिया तालुक्यातील राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य वगळता सर्वाची सहमती आहे. त्यानुसार काँग्रेसच्या सीमा मडावी या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर राहणार अशी चर्चा आहे.मात्र माजी आमदार राजेंद्र जैन हे काँग्रेससोबत बसण्यास तयार होतील का यावर शंका आहे.
राज्यातील राजकारणात जिल्हा परिषदांना मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. इतर ठिकाणी एकमेकांचे जिवलग असलेले गोंदियात मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनले, हे जि.प.तील राजकारणावरून दिसून येते. जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस २०, भाजप १७ व काँग्रेस १६ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या जि. प. मध्ये काँग्रेस व भाजपची युती आहे. हीच युती कायम राहील असा काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. याउलट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनुसार काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला एकहाती सत्ता देण्यासाठी राष्ट्रवादी स्वतःला यावेळी अलिप्त ठेवण्याची खेळी करू शकते. परिणामी, राष्ट्रवादी या मोठ्या पक्षाने भाजपला सत्ता देणे ही जिल्ह्यात नव्या समीकरणांची नांदी ठरू शकेल. जिल्हा परिषदेतील सत्तेचा रंग कसा असेल, याची रंगीत तालीम ही १२ जानेवारीला होणाèया पंचायत समिती सभापती-उपसभापतिपदासाठी होणाèया निवडणुकीच्या सारीपाटावर पाहणे मजेशीर ठरेल.
काँग्रेस व भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागा असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. पक्षनिष्ठा बाजूला ठेवत काही पदलोलपू भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेत पद बळकावले. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हेच खरे सूत्रधार असून प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांसोबत नागपुरात जिल्हा परिषद निवडणुकीला घेऊन चर्चा सुद्धा केल्याची माहिती आहे. तसेही जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद व नगरपरिषदेतील सदस्यांची निवड करताना भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी व्यवस्थित गणित जुळविले होते.
२०१५ मध्ये जि.प. निवडणुकीच्या वेळी भंडारा-गोंदियाच्या खासदारपदी नाना पटोले होते. या अभद्र युती निर्मितीमध्ये त्यांचाही वाटा होता. मात्र, आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जि.प.चा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक आहे. गोंदिया जिल्ह्यात पटोेलेंचे समर्थक जि.प.सदस्य भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षात आहेत. त्यामुळे उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजपत पदाधिकारी निवडीत तालुक्यांना योग्य न्याय मिळाला नाही किंवा इच्छुकांना संधी मिळत नसल्याचे लक्षात आल्यास ऐनवेळी भाजपमध्ये सुद्धा बंडखोरीची शक्यता आहे. सद्यपरिस्थितीत काँग्रेसच्या गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर गोंदिया तालुक्यातील qपडकेपारच्या जिल्हा परिषद सदस्या सीमा मडावी यांचीच वर्णी लागेल, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे मात्र भाजपमध्ये तिरोडा तालुक्यातील रजनी कुंभरे व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मंदा कुंभरे यांच्या नावाची चर्चा असून मंदा कुंभरे यांचे पारडे जड आहे. रजनी कुंभरे यांचे पक्षबदल भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठांचा मात्र त्यांच्यावर अविश्वास असल्याची चर्चा आहे. परिणामी, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. जर भाजपने अध्यक्षपद मागितले तर ते अर्जुनी मोरगाव तालुक्यात जवळपास निश्चित मानले जात आहे. सत्तापिपासू नेत्यांनी भाजप-काँग्रेसची ही युती अडीच वर्षासाठी कायम राहावी, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले असून ६ जानेवारीनंतर सदस्य वारीला निघणार असल्याची कुणकूण सुरू आहे.
No comments:
Post a Comment