गोंदिया,दि.29ःः येत्या 3 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाहिर सभा घेणार आहेत.
त्या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.बालाघाट-गोंदिया रिंगरोड मार्गावरील 16 एकर जागेत तयारी सुरु असून 2 लाख लोक उपस्थित राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.त्यासाठी आजपासूनच सभास्थळावर पोलीसांचा चोख बंदोबस्त सुरु करण्यात आला आहे.नागरिकांच्या बसण्यासाठी सुमारे दीड लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार असून चार ते पाच टॅ्क्टर,जेसीबी रोलरसह मैदानाचे सपाटीकरण सुरु करण्यात आले आहे.या सभेच्या प्रसिध्दीपासून ते नागरिकांना सभास्थळी आणणे व सोडून देण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्चाचे बजेट तयार करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.त्यामुळे या सभेतील खर्चाकडे निवडणुक अधिकारी किती इमानेइतबारे लक्ष देतात की सरकारी यंत्रणा म्हणून दुर्लक्ष करतात अशा चर्चांनाही उधाण आले आहे.या प्रचारसभेत भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासोबतच शेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट लोकसभा मतदारसंघातील मतदारांनाही आणण्यात येणार आहे.माेदीची विदर्भातील ही दुसरी सभा राहणार आहे.त्यापुर्वी ते 1 एप्रिल रोजी वर्धा येथील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याचे वृत्त आहे.सकाळपासून काही भाजपचे पदाधिकारी या सभास्थळावर ठाण मांडून मैदानातील व्यवस्थेकडे लक्ष देत आहेत.विशेष म्हणजे या सभेच्या नियोजनाची सर्व जबाबदारी नागपूरातील एका आमदाराकडे व स्थानिक विधानसभेतील संभाव्य उमेदवाराकडे दिल्याचेही वृत्त आहे.
No comments:
Post a Comment